नांदेड मनपा क्षेत्रात केल्या दहा हजार अॅंटिजेन तपासण्या

प्रमोद चौधरी
Tuesday, 18 August 2020

‘‘नांदेडकर पुढे या...’’या अभियानात नागरिकांची जनजागृती करण्यात आली. त्यासाठी पाच वाहनांमधून विशेष मोहिम राबविण्यात आली. व्यापाऱ्यांकडे प्रत्यक्ष जाऊन या वाहनांनी सात हजारावर अॅंटिजेन  तपासण्या केल्या आहेत.

नांदेड : महानगरपालिकेच्या वतीने आठ दिवसात विशेष मोहिमेअंतर्गद दहा हजार अॅंटिजेन कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान आरटीपीसीआर पद्धतीने देखील सात हजार ७७३ तपासण्या पूर्ण करण्यात आल्याची माहिती मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. सुरेशसिंह बिसेन यांनी दिली.

शहरातील नागरिक तसेच व्यापाऱ्यांसाठी महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी कोरोना अॅंटिजेन तपासणी बंधनकारक केली आहे.  त्यासाठी मनपाने आठ आॅगस्टपासून तपासणी मोहीम हाती घेतली होती. शिवाजीनगर औद्योगिक वसाहतीत असलेल्या नाना-नानी पार्क येथे नागरिकांसाठी अॅंटिजेन तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. याशिवाय नवा मोंढा, जुना मोंढा, कापड मार्केट, हनुमान टेकडी, फ्रुट मार्केट, वजिराबाद मार्केट व आनंदनगर मार्केट अशा शहरामध्ये विविध ठिकाणी कॅम्प लावण्यात आले होते. या मोहिमेला व्यापारी तसेच नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिल्याचे डॉ. बिसेन यांनी सांगितले.

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात मूग, उडीद पिकांचे नुकसान, कशामुळे? ते वाचाच

महापालिकेचे शहरात तीन कोविड सेंटर
महापालिकेने चालविलेल्या या मोहिमेमध्ये आठच दिवसात ८०५ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच आरटीपीसीआर पद्धतीने सात हजार ७७३ तपासण्याही करण्यात आलेल्या आहेत. महापालिकेने शहरात एनआरआय व पंजाब भवन आणि कौठा असे तीन कोविड सेंटर सुरु केले आहे. त्यापैकी एनआरआय व पंजाब भवनची क्षमता ३०० तर कौठा इथील महसूल इमारतीची १५० रुग्णांची आहे. 

हेही वाचलेच पाहिजे - हिंगोली : सिध्देश्वरचे नऊ दरवाजे उघडले, पूर्णा, कयादूला पूर

मोहिमेत आढळले ५०० रुग्ण
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील ५० वर्षांवरील नागरिकांची तपासणी करण्यात आली. ४५७ बीएलओ तसेच मनपाच्या एएनएम व नर्स यांच्या ५० जणांच्या टीमने जवळपास एक लाख लोकसंख्येची आरोग्य तपासणी पूर्ण केली आहे. यामध्ये गुगलशीटद्वारे रक्तात आॅस्कीजनची कमतरता तसेच ताप, खोकला, सर्दी, दम लागणे, रक्तदाब, मधूमेह यासारख्या आजारांची तपासणी केली असून ५०० रुग्णांना मोहिमेतून उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.

खासगी रुग्णालयांना परवानगी
शासकीय रुग्णालय तसेच महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये आणि कोरोना केअर सेंटरमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. परंतु, दिवसागणीक रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता शासकीय रुग्णालयांमधील सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे मनपा प्रशासनाने शहरातील सात खासगी रुग्णालयांना कोरोना केअर सेंटर सुरु करण्याची परवानगी दिली आहे.

येथे क्लिक कराच - मानधनाअभावी वृद्ध कलावंतांची परवड, कशी? ते वाचाच

नांदेडकरांचा मिळाला प्रतिसाद
‘‘नांदेडकर पुढे या...’’या अभियानात नागरिकांची जनजागृती करण्यात आली. त्यासाठी पाच वाहनांमधून विशेष मोहिम राबविण्यात आली. व्यापाऱ्यांकडे प्रत्यक्ष जाऊन या वाहनांनी सात हजारावर अॅंटिजेनतपासण्या केल्या आहेत. याशिवाय तीन स्कूल बसमधून हायरीस्क पॉझिटिव्ह रुग्णांचीही वाहतूक करण्यात आलेली आहे.- डॉ. सुरेशसिंह बिसेन, आरोग्य अधिकारी (मनपा)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ten Thousand Antigen Tests Conducted Nanded News