esakal | फुलवळ येथील राष्ट्रीय महामार्ग देतोय अपघातांना आमंत्रण

बोलून बातमी शोधा

Nanded road
फुलवळ येथील राष्ट्रीय महामार्ग देतोय अपघातांना आमंत्रण
sakal_logo
By
धोंडिबा बोरगावे

फुलवळ ( जिल्हा नांदेड ) : फुलवळ येथून जात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम आणि रस्त्यात पडलेले खड्डे हे जीवघेणे बनले असून त्यामुळे उद्भवलेली परिस्थिती ही अपघातांना आमंत्रण देत आहे. या संदर्भात सकाळ वर्तमानपत्रातून वारंवार वाहनधारक व प्रवाशांच्या व्यथा मांडल्या परंतु ना संबंधित ठेकेदाराला जाग येतेय ना प्रशासनाला, एवढेच काय तर लोकप्रतिनिधी सुद्धा याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत की काय असाच प्रश्न सामान्य माणसाला पडतो आहे.

अपघात परिस्थितीच ज्वलंत उदाहरण म्हणजे बुधवारी (ता. २१) एप्रिल रोजी चार वाजेच्या सुमारास एक कार हे वाहन (एमएच२६-एन ६०७५) ही गाडी जांब- जळकोट रस्त्यावरुन कंधारकडे जात असताना फुलवळ बसस्थानक शेजारी राष्ट्रीय महामार्ग तयार करण्यासाठी खोदलेल्या रस्त्यावर असलेल्या कॉर्नरला अचानक त्या वाहन चालकाचा आपला ताबा सांभाळता आला नसल्याने आणि गाडीची स्पीडही जोराची असल्याने ती कार चक्क खड्ड्यात कोसळली, सुदैवाने बारी सांभाळली आणि जीवितहानी टळली. सदर गाडीत केवळ एकटाच चालक उपस्थित होता. त्याच्याही जीविताला काही हानी झाली नसून गाडीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा - नांदेड : राष्ट्रीय महामार्गावरील कोलमोडलेल्या पुलाच्या पुनर्बांधणीला सुरुवात

खोदून ठेवलेल्या आणि अर्धवट सोडलेल्या रस्त्याच्या कामामुळे भविष्यात यापुढेही असेच होणारे अनर्थ टाळायचे असतील आणि कोणाचे जीव गमावू नये असे वाटत असेल तर राष्ट्रीय महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण करावे आणि अपघात टाळावेत याशिवाय पर्याय नसून संबंधितांनी या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष घालून सदरील ठेकेदाराला जाब विचारला पाहिजे आणि कामाला लवकरात लवकर सुरुवात केली पाहिजे असे मत प्रवाशी, ग्रामस्थ व वाहनधारकडून व्यक्त केले जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे