Nanded : एसटीच्या संपामुळे टपाल व्यवस्था कोलमडली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी कर्मचाऱ्यांचा संप

एसटीच्या संपामुळे टपाल व्यवस्था कोलमडली

कंधार : एसटी महामंडळाला राज्य शासनात विलीन करून घ्यावे या प्रमुख मागणीसाठी राज्य एसटी कर्मचाऱ्यांनी अघोषित संप पुकारला आहे. यामुळे गेल्या १८ दिवसापासून एसटीची चाके एकाच ठिकाणी थांबली आहेत. कंधारमधील एसटी कर्मचारीही संपात सहभागी झाल्याने एसटी सेवा खोळंबली. याचा परिणाम टपाल व्यवस्थेवर होऊन नागरिकांसमोर अडचणींचा डोंगर उभा ठाकला आहे. बहुजन हिताय-बहुजन सुखाय असे ब्रीद घेऊन धावणारी लालपरी रुसल्याने अवैध वाहतूक बोकाळली असून यामुळे नागरिकांच्या जीवितासही धोका निर्माण होत आहे.

एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यांना कोणताही तोडगा मान्य नाही. संपामुळे एसटीद्वारे सुरू असलेली पार्सल सेवा प्रभावित होऊन व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे माल अडकून पडले आहे. हा संप वरचेवर चिघळत चालला आहे. दीपावली सारख्या सणाला सुद्धा एसटी बंद होती. या मुळे प्रवाशांची तारांबळ उडाली होती. एसटीचा प्रवास सुरक्षित असल्याने प्रवासी एसटीला प्राथमिकता देतात, पण ऐन सणासुदीच्या दिवशी एसटी बंद असल्याने नागरिकांना खासगी गाड्यात बसून गाव गाठण्या शिवाय पर्याय नव्हता. या संधीचा लाभ उठवत खासगी वाहतूक करणाऱ्यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले. नाविलाजाने नागरिकांनी धोका पत्करून खासगी गाड्यातून प्रवास केला आणि आताही करत आहेत.

अडचणीत वाढ होण्याची शक्यता

एसटी बंद असल्याचा फटका प्रवाशांना मोठ्याप्रमाणे होतोच आहे, याचा फटका टपाल व्यवस्थेला जाणवत आहे. टपाल विभागावर नागरिकांचा विश्वास असतो. यामुळे विविध आर्थिक व शैक्षणिक कामासाठी नागरिक टपाल विभागाला पसंती देतात. परंतू एसटी बंद असल्यामुळे एकही काम वेळेवर होत नाही. मोबाईलमुळे जग मुठीत आल्याने टपाल विभागाकडून पूर्वी सुरू असलेली कार्ड सेवा आता सुरू नसली तरी टपाल विभागाकडून सुरू असलेल्या इतर सेवा एसटी बंद असल्याने खंडित झाल्या आहेत. रजिस्ट्री, धनादेश आदी महोत्वाचे काम टपाल विभागाकडून होत नाहीत. याचा फटका नागरिकांना बसत आहे. गेल्या १५-२० दिवसांपासून टपाल विभागातील कामावर त्याचा परिणाम जाणवत असून संप लांबत राहिला तर नागरिकांच्या अडचणीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.

loading image
go to top