नांदेड जिल्ह्यात अंगणवाडीच्या आहारापासून बालक वंचित

बाबुराव पाटील
Tuesday, 6 October 2020

भोकर शहरामध्ये १८ अंगणवाड्या असून शहरी प्रकल्प नांदेड येथे जोडलेले आहेत. यापूर्वी भोकर शहरातील अंगणवाड्या ग्रामपंचायत असताना भोकर मध्येच ग्रामीण प्रकल्पाला जोडलेल्या होत्या.

भोकर (नांदेड) : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालके, स्तनदा माता, गरोदर माता, यांच्यासाठी पूरक आहार अंगणवाड्यामधून पुरवला जातो. शहरातील अनेक भागांमधील बालकांना आहार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यांची नोंदच नाही असे त्यांना सांगितले जाते. कोरोना संकटाच्या काळामध्ये सुद्धा गेली सहा महिन्यापासून गोरगरीब बालकांना आहार मिळत नसल्याच्या अनेक तक्रारी आहेत. 

भोकर शहरामध्ये १८ अंगणवाड्या असून शहरी प्रकल्प नांदेड येथे जोडलेले आहेत. यापूर्वी भोकर शहरातील अंगणवाड्या ग्रामपंचायत असताना भोकर मध्येच ग्रामीण प्रकल्पाला जोडलेल्या होत्या. मात्र नगर पालिका झाल्यानंतर नांदेड कार्यालयाला जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे संबंधित अधिकारी हे नांदेडला राहूनच येथील कारभार पहात असतात. त्यांचे कधी दौरे दिसत नाही, बैठकाही नियमित होत नाहीत. 

अनेक बालके राहतात आहारापासून वंचित

भोकर शहरातील अंगणवाड्या शहरी प्रकल्प नांदेडला जोडल्यानंतर जवळपास दहा वर्षांपूर्वी जी नोंद घेण्यात आली होती. त्या नोंदी प्रमाणेच आहार वाटला जातो. भोकर शहर मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या असलेले शहर असून शहराची लोकसंख्या ३५ हजार असताना केवळ १८ अंगणवाड्या शहरामध्ये आहेत. शहरातील भाग सुद्धा वाढलेला आहे, त्यामुळे बालकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र त्यांची नोंद नाही असे सांगितले जाते. वाढीव बालकांची नोंद घेणे हे शहरी प्रकल्पाचे काम असतानासुद्धा वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष  करतात. त्यामुळे मंजुळा नगर, रशिद टेकडी, शास्त्री नगर, समता नगरचा काही भाग, गांधी चौकामधील काही वाढीव वस्ती, जिल्हा परिषद हायस्कूलच्या पाठी मागे, विद्युत नगर, बोरगाव रस्त्याची वाढीव वस्ती, अशा अनेक भागातील बालकांना खाऊ मिळत नाही अशा तक्रारी आहेत.

अंगणवाडी कार्यकर्तीकडून याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगण्यात आले मात्र, वरिष्ठांनी वाढीव बालकांच्या नोंदीबाबत, आहार वाटपाबाबत काही दखल घेतलेली नाही. जे नोंदणीकृत बालके आहेत त्या १८ अंगणवाड्यांना यापूर्वी नांदेड येथील एका गुत्तेदारामार्फत निकृष्ट दर्जाचा आहार पुरवठा केला जात होता. नियमानुसार सदरील कंत्राटदार आहार वाटत करत नव्हता, मात्र वरिष्ठ अधिकारी याकडेही दुर्लक्ष करत होते. 
 
कोरोना संकटात बालके राहिली वंचित

भोकर शहरातील वाढीव वस्तीमधील राहिलेले बालके वरिष्ठ अधिकाऱ्यांना जवळच्या अंगणवाडीला जोडता आली असती. कोरोना संकट काळात अनेक गोरगरीब लोकांना रोजगार मिळाला नाही, त्यामुळे त्या बालकांना फायदा झाला असता मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक माता, बालके, अंगणवाडीमध्ये येऊन रिकाम्या हाताने घरी परत जात आहेत. नियमानुसार जी बालके वंचित आहेत त्यांची नोंद घेऊन जवळच्या अंगणवाडीमार्फत बालकांना आहार वाटप करता आला असता, मात्र शहरी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसते. 

वंचित बालकांना न्याय कधी मिळणार
 
भोकर शहरातील १८ अंगणवाड्या नांदेड शहरी प्रकल्पाला जोडलेल्या असल्यामुळे तेथील अधिकाऱ्यांना चार नगरपालिका क्षेत्रांमधील अंगणवाड्यांचे काम पाहावे लागते. त्यामुळे त्यांना येथील अंगणवाड्यांना भेट देणे, दौरे करणे, पाहणी करणे, असा वेळ मिळत नाही. शहरातील अनेक वस्त्यांमधील वाडी वस्त्यांमधील बालके अंगणवाडीच्या आहारापासून वंचित राहत आहेत. त्या बालकांची नोंद घेऊन त्यांना शासनाच्या वतीने मिळणारा आहार, स्तनदा माता, गरोदर माता यांनाही शासनाच्या वतीने मिळणारा आहार देण्यात यावा, अशी मागणी शहरातील नागरिकांमधून होत आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले                            


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There are complaints that children in Bhokar areas are not getting Anganwadi food