नांदेड : उमरीच्या ग्रामीण रुग्णालयाची दुरावस्था

प्रल्हाद हिवराळे
Tuesday, 24 November 2020

येथील रुग्णालय परिसरात झाडे-झुडपे वाढलेले असून या परिसरात सापांचा वावर नेहमी असल्याचे येथील रुग्णांनी सांगितले आहे. एकीकडे उमरी ग्रामीण रुग्णालयाचा कारभार राम भरोसे सुरू असून वैद्यकीय अधीक्षक मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचे खुद्द येथील कर्मचारीच सांगतात.

उमरी (नांदेड) : रुग्णालय म्हटले तर त्या ठिकाणचा परिसर स्वच्छ असायला हवा, तसेच रुग्णालयातील सर्व सोयी सुविधा पुरविण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जावी. पण उमरी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात कोणत्याच सुख सुविधा मिळत नाहीत. इमारतीच्या दर्शनी भागात तर चक्क छतावर भलेमोठे पिंपळाचे झाड उगवले असून रुग्णालय प्रशासनाला ते काढण्यासाठी वेळच नाही असे दिसून येत आहे.
 
येथील रुग्णालय परिसरात झाडे-झुडपे वाढलेले असून या परिसरात सापांचा वावर नेहमी असल्याचे येथील रुग्णांनी सांगितले आहे. एकीकडे उमरी ग्रामीण रुग्णालयाचा कारभार राम भरोसे सुरू असून वैद्यकीय अधीक्षक मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष करत असल्याचे खुद्द येथील कर्मचारीच सांगतात. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी आलेल्या रुग्णांना अडथळा निर्माण होत असून सुरक्षेच्या कारणास्तव येथील ग्रामीण भागातील गरीब रूग्ण विनाकारण खासगी रुग्णालयाकडे ओढले जातात. 

बऱ्याच वेळा रुग्णांनी आपल्या समस्येबाबत वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडे तक्रार करून सुद्धा काहीही सुधारणा झाली नसल्याचे रुग्ण सांगत आहेत. तसेच रुग्णालय परिसरात स्वच्छता नसून जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरणात रुग्णांना व नातेवाईकांना दिवस काढावे लागत आहेत. रात्रीच्या वेळी रुग्णालय परिसरात तालुक्यातील काही मद्यपी नागरिक त्रास देत असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांना राहण्यासाठी व्यवस्था नसल्यामुळे त्यांना दवाखान्याच्या आवारातच झोपावे लागते. तसेच येथे पिण्याचे शुद्ध पाणी नसून बाहेरून शुद्ध पाण्याची बॉटल विकत आणावी लागते. 

गेल्या कित्येक वर्षापासून रूग्णालयाला कुठलीच रंगरंगोटी करण्यात आली नाही. काही भिंतींवर तर शेवाळे चढलेले आहे. यामुळे अंमलबजावणी अभावी ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची अवकळा झाली आहे. ‘सकाळ’ने येथील साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या दुरवस्थेबद्दल विचारले असता साफसफाई करण्याचे साहित्य पुरवठा केला जात असल्याचे या वेळी त्यांनी सांगितले. मग रुग्णालयांना येणारी रक्कम नेमकी कुठे खर्च केली जाते असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

संपादन - सुस्मिता वडतिले 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There are no amenities available in rural hospitals in Umri taluka