सूर्याभोवती खळे अन चर्चेला उधाण...

प्रकाश जैन
रविवार, 28 जून 2020

सूर्याभोवती पडणारे खळे किंवा रिंगण हा निसर्गाचा केवळ एक आविष्कार असून, यात घाबरण्यासारखे किंवा धोकादायक काहीही नाही, असे खगोलशास्त्रज्ञांनी सांगितले.

हिमायतनगर (जि.नांदेड) : जिल्ह्यात रविवारी सकाळी साडेदहा ते अकराच्या सुमारास सूर्याभोवती खळे तयार झाले होते. अनेकांनी हा प्रसंग आपल्या कॅमेऱ्यात टिपला असून, या प्रकाराबाबत नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले होते. कोरोना संकट काळात आता हे काय? अशा प्रतिक्रियाही उमटल्या.
 
का तयार होते असे खळे...
या रिंगणाला हेलो असे म्हणतात. हा फिजिक्समधील आॅप्टिक्सचा एक भाग असून, प्रिझममधून किरणे गेल्यानंतर दिसणाऱ्या सप्तरंगाप्रमाणे हा प्रकार आहे. मराठीमध्ये याला इंद्रधनुष्याचे प्रभामंडळ म्हटले जाते. वादळानंतर आकाशात सुमारे २० हजार फूट उंचीवर सिरस नावाचे ढग तयार होतात. त्यामध्ये बर्फाचे लाखो क्रिस्टल्स असतात. हे बर्फाचे षटकोनी तुकडे प्रिझमप्रमाणे काम करतात. त्यातून सूर्यकिरणे आरपार जाताना त्या किरणांचे रिफ्लेक्शन तयार होते. याला रिफ्रॅक्शन किंवा स्पिटिंग असेही म्हटले जाते. यातून हे लालसर, निळ्या रंगाचे रिंगण तयार होते.

हेही वाचा - उच्च शिक्षणातून जबाबदार नागरिक घडावेत : डॉ. सुखदेव थोरात

सूर्याभोवती असे रिंगण दिसून आले की, कमी पर्जन्यमान, दुष्काळ, पाणी टंचाई, नैसर्गिक आपत्ती येणार असे ग्रामीण भागात मानतात. मात्र, खगोलशास्त्रांच्या मते हे रिंगण म्हणजे पावसाचा तसेच बर्फवृष्टीचा संकेत मानला जातो. मात्र, दरवेळीच पाऊस पडेल, असेही होत नाही. 

हेही जाणून घ्या...

  • कमी तापमान असलेल्या देशांत सन हेलो दिसणे ही सामान्य बाब.
  • हे रिंगण केव्हा दिसणार याचे पूर्वानुमान लावता येत नाही
  • वादळापूर्वीही आणि नंतरही तयार होऊ शकते हे रिंगण
  • हेलो तयार होण्यासाठी सूर्य आणि बर्फाचे क्रिस्टल एका विशिष्ट कोनात येण्याची गरज
  • सूर्यच नव्हे, तर चंद्राभोवतीही तयार होते असे रिंगण.

पावसाळ्यात जर सूर्याभोवती खळे दिसले तर त्याला ढगांची सारस स्थिती म्हणतात. त्या भागात कमी पाऊस होणार असे संकेत असतात; पण ती अवस्था तात्पुरती असून काही दिवसात बदलू शकते. पावसाळ्यात ढगांची घनता जास्त असल्याने सूर्यदर्शन होत नाहीच पण खळे तयार झाले तर याचा अर्थ असा की, त्या भागात विरळ ढग तयार झाल्याने त्यातून प्रकाशाचे परावर्तन होते आणि या अवस्थेमुळे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल; पण मुसळधार नाही.
- श्रीनिवास औंधकर, संचालक, डाॅ. एपीजे अब्दुल कलाम वेधशाळा, एमजीएम, औरंगाबाद.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There Is A Lot Of Discussion Around The Sun Nanded News