नांदेड : शेतकरी आंदोलनात राजकारण असून कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी- पाशा पटेल 

file photo
file photo

नांदेड ः  केंद्र शासनाने कृषी पणन संदर्भात केलेल्या तीन कायद्याविरोधात पंजाब व हरियाणातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलकांनी हमीभावाच्या मागणीचा मुद्दा सोडून दिला आहे. यामुळे यात आता राजकारण होत असल्याचा आरोप राज्य कृषिमूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांनी केला.

नांदेड येथे बांबू लागवड कार्यशाळे संदर्भात आलेल्या पाशा पटेल यांनी बुधवारी (ता. नऊ) पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, शेतकऱ्यांचे शोषण करणारे, त्यांची लूट करणारे कायदे थांबण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ५५ वर्षानंतर त्यात बदल केला. शरद जोशी यांच्या विचारानुसार कायद्यात बदल करून शेतकऱ्यांना त्यांचा माल कुठेही विक्री करता यावा यासाठी खुली स्पर्धा निर्माण केली. परंतु पंजाब आणि हरियाणातील शेतकरी आंदोलक यात किमान हमी दराचा समावेश करावा यासाठी आंदोलन सुरू केले. तोपर्यंत आंदोलनाची दिशा ठिक होती. परंतु, आता आंदोलक आडमुठेपणाची भूमिका घएवून कायदेच रद्द करण्याची मागणी करत आहेत.

केंद्राने व्यवस्था बदलून शेतकऱ्यांची लूट थांबवावी, बाजारात स्पर्धा निर्माण व्हावी यासाठी कायद्यामध्ये बदल केला. यासोबतच शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या निर्माण करून त्यांना पायाभूत सुविधा देण्याचे कामही केंद्र सरकार करत आहे. यामुळे शेतकऱ्यांची लूट शोषण थांबेल यासाठी केंद्राने तीन कायदे अमलात आणले. परंतु सध्या देशात यामध्ये राजकारण शिरल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होईल. कारण व्यवहारात स्पर्धा लावल्यामुळे यातून शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असेही पाशा पटेल यांनी सांगितले. 

भोकर-बारड मार्गावरील अपघातात पोलिस कर्मचारी जखमी

नांदेड ः तपासकामी जात असलेल्या पोलिसांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या वाहनाने धडक दिल्याची घटना भोकर ते बारड मार्गावर बुधवारी (ता.नऊ) सकाळी घडली. यामध्ये पोलिस कर्मचाऱ्यांसह आठ ते नऊ जण गंभीर जखमी झाले असून एका वाहन चालकाला वाहनाचा दरवाजा कटरने कापून बाहेर काढावे लागले.

तामसा पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक श्री. जगडे, आडसुळे, कोळशिकवार हे कर्मचारी तपासकामी (एमएच-१२, केवाय-१२०७) या चारचाकी वाहनाने उस्मानाबादला जात होते. दरम्यान बुधवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास त्यांच्या वाहनाला समोरून येणारे वाहन (क्र. एमएच-४६, बीएम-३१३५) या वाहनाने त्यांना जबर धडक दिली. यामध्ये पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.
समोरून धडक दिलेल्या एका वाहनात अडकून पडलेल्या चालकाला कटरच्या साह्याने दरवाजा कापून बाहेर काढण्यात आले. या अपघातात पोलिसांसह आठ ते नऊ जण जखमी झाले. अपघातानंतर महामार्गचे पोलिस निरीक्षक अरुण केंद्रे, बारडचे विठ्ठल दुरपडे, भागवत आयनले, अप्सर पठाण, बालाजी ठाकुर यांनी जखमींना रुग्णवाहिकेद्वारे बारड तसेच नांदेडच्या खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com