नांदेड शहरात चोरट्यांचा धुमाकुळ, एकाच रात्री तीन दुकाने फोडली

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 5 August 2020

तिन्ही दुकानातून चोरट्यांनी रोख रक्कमेसह मोबाईल व अन्य साहित्य लंपास केले. या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा.

नांदेड : शहरातील वजिराबाद भागात चोरट्यांनी सोमवारी (ता. तीन) रात्री मोबाईल शॉपी, रेडिमेट सेंटर आमि अन्य एक दुकान अशी तीन दुकाने फोडली. तिन्ही दुकानातून चोरट्यांनी रोख रक्कमेसह मोबाईल व अन्य साहित्य लंपास केले. या प्रकरणी वजिराबाद पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहराचा आत्मा म्हणून वजिराबाद भागाकडे पाहिल्या जाते. नितीन ठाकूर यांचे या परसिरात नितीन मोबाईल शॉप नावाचे दुकान आहे. त्याने आपले दुकान सोमवारी (ता. तीन) सायंकाळी बंद करून घरी गेला. त्याच रात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या सेटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी दुकानातील रोख तीन हजार रुपये आणि मोबाईल असा ३० हजारांचा ऐवज लंपास केला आहे.

हेही वाचा -  नांदेड जिल्ह्यातील या सात कृषी सेवा केंद्रावर निलंबनाची टांगती तलवार

वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

तर दुसऱ्या घटनेत वजिराबादमध्ये पार्थ कलेक्शन आणि रेडीमेड सेंटर या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यावेळी दुकानातील रोख रकमेसह इतर साहित्य लंपास करण्यात आले. या प्रकरणी दुकानमालकाने दिलेल्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. यासोबतच तीसरे दुकान फोडून चोरट्यांनी काही रक्कम व दुकानातील साहित्य लंपास केले. या तीन चोरीच्या घटना एकाच रात्री घडल्याने व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. 

मुख्य रस्त्यावरील दुकाने फोडण्याचा सपाटा

यापूर्वीही वजिराबाद भागात चोरट्यांनी मुख्य रस्त्यावरील दुकाने फोडण्याचा सपाटा सुरू केला होता. दरम्यान जिल्ह्यात दरोडे, लूटमार, गोळीबार, घरफोडीच्या घटना घडत असताना त्यांनी आपला मोर्चा मुख्य बाजारपेठेतील दुकानांकडे वळविला आहे. त्यामुळे व्यापारी धास्तावले आहेत. भरदिवसा दरोडा, गोळीबाराच्या घटना शहर व जिल्ह्यात घडत आहेत. स्थानिक पोलिसांनी गस्त वाढवावी अशी मागणी व्यापारी व नागरिकांतून होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thieves broke into three shops in Nanded in one night nanded news