भारुडातून सामाजिक परिवर्तनाचा जागर करणारी तिसरी पिढी

Nanded News
Nanded News

नांदेड  : ‘शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता’  या ओळीप्रमाणे शरीराची व मनाची शांतता ही भजनातून निर्माण होत असते. गणपती, शारदा, विठ्ठल, गुरु, राम, महादेव, देवी, साईबाबा, मारुती, बालाजी आदी पदे सदर करून गौळणी, भारुडाच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचा विडा यशवंतनगरातील महिलांनी उचलला आहे.

यशवंतनगर भागात १९८२ मध्ये शिवशक्ती महिला भजनी मंडळाची स्थापना विमलबाई देशपांडे, शोभा मुखेडकर, सिंधु टाले, सरिता वसेकर, गोगटे आजी, चिडगोपेकर यांनी केली. तेव्हापासून आजपर्यंत त्यांचा वारसा दुसरी आणि तिसरी पिढी चालवत आहे. अध्यात्मिकतेसोबतच व्यक्तिमत्व विकासाकडे वाटचाल करताना सामाजिक विकासाचे भानही या मंडळाने अखंडित ठेवले आहे. या यशस्वी वाटचालीत तिसऱ्या पिढीतील सुनीता मिरजकर, शालिनी कुलकर्णी यांचा खारीचा वाटा आहे. मंडळातर्फे इतर मंडळांना चालना देण्यासाठी सातत्याने कार्यक्रम होतात. यातून आजवर २५ भजनी मंडळांनी सादरीकरण केलेले आहे, हे या मंडळाचे वैशिष्ट्य आहे.

सामाजिक परिवर्तनाचा निर्धार
मंडळातील सर्वच महिला गौळणी, गोंधळ आणि जोगवा यातून समाजामध्ये नीतिमूल्य रुजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सद्यस्थितीत समाजातील नीतिमूल्यच हरवत चालल्यामुळे समाज विस्कळित झाला आहे. त्याला पूर्वपदावर आणण्यासाठी मंडळातील महिला सदस्यांचा प्रयत्न खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. सोंगी भारुडाच्या माध्यमातून हुंडा, स्त्री समस्या, स्वच्छता, पर्यावरण, वृक्षाचे महत्त्व, जलपुनर्भरण आदी ज्वलंत विषयांवर प्रबोधन करून सामाजिक परिवर्तन करण्याचाही निर्धार या महिलांनी केलेला आहे. 

विविध वाद्यांची सांगड
एवढेच नाहीतर कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करून त्यांना पाठबळ देण्याचा, स्वावलंबी बनविण्याचाही उपक्रम सातत्याने मंडळाच्यावतीने राबविले जात आहेत. मंडळाचे आजवर आकाशवाणी केंद्रावरही भजनगायनाचे कार्यक्रम झालेले आहेत. २००७ मध्ये ई-टीव्हीवरही मंडळाचा कार्यक्रम झालेला आहे. महिला टाळ, डमरू, बासरी, डफली, शंख, टिपऱ्या, घुंगरु, चिपळ्या आदी वाद्यांची सांगड घालून उत्कृष्ट भजनगायनही करतात.

मंडळाची काय आहे उद्दिष्ट्ये
फक्त भजन-गायन करून किंवा प्रबोधन करून मंडळातील सदस्या थांबलेल्या नाहीत. तर उद्दि्ष्ट्येही पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत धार्मिकता व पावित्र्यता मनावर बिंबवणे, सुसंपन्न व्यक्तिमत्त्वाचा पाया घालणे, सामाजिक व नैतिक मूल्यांचा विकास करणे, उत्तम चारित्र्य निर्माण करणे तसेच संपादलेले ज्ञान एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित करण्याचे कार्य मंडळातील सदस्यांकडून होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com