esakal | लॉकडाउन : बॅंडबाजा वाजविणारे हजारो हात थांबले
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी देश लॉकडाउन झाला. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामध्ये बॅंडबाजा विजविणाऱ्यांचाही समावेश असून, सिजन रिकामा गेल्याने वर्षभर कुटुंबाचा गाडा कसा हाकावा असा प्रश्‍न त्यांच्यासमोर उभा आहे.

लॉकडाउन : बॅंडबाजा वाजविणारे हजारो हात थांबले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : बॅंडबाजा हा कोणत्याही धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक कार्यक्रमात अनिवार्य असतोच. बाजा वाजला की वातावरण लगेचच बदलून जातो. लग्नसराईत वाजणारी धून...वधू पक्षासह उपस्थितांना गहिवरून टाकते.  बॅंडबाजा वाजवून उपजिविका करणाऱ्यांची संख्या अधिकची आहे.

लग्नाची धूम...वाढदिवस...मिरवणूक...राजकीय समारंभ...जयंती उत्सव...अशा प्रत्येक कार्यक्रमांची शोभा वाढविण्याचे काम बॅंडपथक करत असते. एवढेच नाही तर कुस्तीच्या फडात हलगी कडाडली की पहेलवानांच्या अंगात येतं...पोतराज अंगावर फटके हलगीच्या तालावरच मारून घेतो व पोट भरतो. समारंभाची शोभा वाढविणारे... जयंतीतील हजारोंना थिरकायला लावणारे बॅंजोपथक ‘कोवीड-१९’मुळे जिल्ह्यातील शेकडोंचे हात थांबले. त्यांच्यावर वर्षभराची कमाई गेल्यामुळे उपासमारीची वेळ आली. मुलांचे शिक्षणही धोक्यात आले आहे.

हेही वाचा - Nanded Breaking : चोवीस तासात कोरोनाचा दुसरा बळी, एकूण संख्या १६ वर -

चाबूकाचेही फटके थांबलेत
चैत्रानंतर सर्वत्र लग्नाची धूम उडते. वैशाखात तर ती अधिकच असते. लग्नाच्या हळदीपासून ते नवरी पाठविण्यापर्यंत बॅंडबाजा असतो. काळानुरूप अलिकडे वाढदिवसाचे सोहळे असो की, गावागनिक आमदार, खासदार, मंत्री यांचे सत्कार सोहळे वा उद्‍घाटन समारंभ; त्यात बॅंडबाजा वाजलाच म्हणून समजा. कारण बॅंडबाजाशिवाय कार्यक्रमाला शोभाच नाही. पोतराज हलगीच्या तालावरच हातावर फटके मारून पोट भरतो. ती हलगी आणि चाबूकाचे फटकेही कोरोनामुळे थांबलेत.

हे देखील वाचा - Video - नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट
 

हलगी वादकांवरही उपासमार
भीमजयंती, शिवजयंती सोहळ्याला करमाळा, अंबाजोगाई, बार्शी, चाळीसगाव, जिंतूर येथील बॅंडपथक नांदेडमध्ये हमखास येते. त्याची ५० ते ७० हजारापर्यंत सुपारी असते. आपल्या जिल्ह्यात जयंती सोहळ्यात हे बॅंडवाले किमान पाच ते सात लाख रुपये कमावून घेवून जातात. नांदेड शहर व जिल्ह्यातील बॅंडपथकांची संख्याही मोठी आहे. खेड्यात लग्न वाजविण्यासाठी किमान दहा ते पंधरा हजारापर्यंत कार्यक्रम घेतला जातो. जेवढे अधिक माणसे तेवढी सुपारी जास्त असते. शिवाय खेड्यात या काळात जत्रा व त्याला लागून कुस्त्यांचा डाव भरतो. त्यामुळे हलगी वादकांचीही कोरोनामुळे गावनिहाय पंचायत आली आहे. 

आमच्या उपेक्षितांकडे कोण देणार लक्ष
बॅंडपथकातील कामगार कोरोनाच्या टाळेबंदीत आता घरीच आहेत. त्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे दामही नाही. हे सिझन गेल्यात जमा आहे. कोरोनामुळे आमचा व्यवसाय संकटात सापडला आहे. सर्वांवर उपासमारीची वेळ अलून असून, आमच्या उपेक्षितांकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्‍न पडला आहे.
- विठ्ठल दुर्गाजी दाढेल, गंगा बॅंडपथक लोहा