क्वारंटाईन कक्षात तपासणी करणाऱ्या आशांना धमकी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 31 May 2020

हदगाव तालुक्यातील मनाठा पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल. दुसऱ्या घटनेत किनवट तालुक्यातील सिंगारवाडी येथे एका तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू.

 

नांदेड : क्वारंटाईन करण्यात आलेल्या कामगारांची आरोग्य तपासणी करण्यासाठी गेलेल्या अंगणवाडी सेविकांना धमकावत त्यांच्या हातचे दप्तर फेकून देऊन शासकिय कामात अडथळा निर्माण केला. एवढेच नाही तर ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना पिंगळी (ता. हदगाव) येथे बुधवारी (ता. २७) सायंकाळी चार वाजता घडली.

पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, तामसा अंतर्गत उपकेंद्र केदारगुडा, पिंगळी (ता. हदगाव) येथे बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना क्वारंटाईन करून पाटबंधारे विभागाच्या इमारतीत ठेवण्यात आले आहे. या इमारतीला कोविड- १९ क्वारंटाईन केंद्र म्हणून कार्यरत करण्यात आले आहे. या केंद्रावर क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांच्या आरोग्याची काळजी व तपासणी करण्यासाठी आशा वर्कर सुरेखा मस्के आणि त्यांच्या सहकारी अंगणवाडी सेविका ज्योती कापसे ह्या दोघीजणी तेथे गेल्या होत्या.

हेही वाचा - खाकीला डाग, सोनखेडचा ठाणेदार कंट्रोलला -

यावेळी त्यांना अटकाव करत आपले ओळखपत्र दाखवा, आधार कार्ड दाखवा असे म्हणून त्यांना वाद घातला. शिविगाळ करून शासकिय कामात अडथळा निर्माण करून त्यांच्या हातातील शासकिय दप्तर फेकून दिले. एवढेच नाही तर चक्क तुम्ही आम्हाला एकट्यात दिसल्या की ठार मारण्याची धमकी दिली. तसेच सुरेखा मस्के यांना लाथांनी मारहाण केली.

मनाठा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

भयभीत झालेल्या या दोन्ही महिला कर्मचाऱ्यांनी घडलेला प्रकार आपल्या वरिष्ठआंना सांगितला. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांच्या सुचनेवरून मनाठा पोलिस ठाणे गाठले. सहाय्य पोलिस निरीक्षक राजेंद्र मुंडे यांना घडलेल्या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर सुरेखा मस्के यांच्या फिर्यादीवरून मनाठा पोलिसांनी संदीप संभा साबळे, देवानंद दत्ता भोसले आणि अविनाश रमेश चव्हाण सर्व राहणार पिंगळी यांच्याविरुद्ध शासकिय कामात अडथळा व आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हवालदार श्री. पवार करत आहेत.

हे देखील वाचलेच पाहिजे - ‘या’ माफियांवर आली सक्रांत, महसुल पथकाने ४० तराफे जाळले - ​

विहीरीत पडून एकाचा मृत्यू

नांदेड : विहीरीत पडलेली बकेट काढण्यासाठी उतरलेल्या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना सिंगारवाडी (ता. किनवट) शिवारात शनिवारी (ता. ३०) सकाळी अकरा वाजता घडली.

सिंगारवाडी शिवारात सुंगारगुडा (ता. किनवट) येथील बांधकाम करणारा अशोक आम्रु मडावी (वय २०) हा गोला होता. दुपारी विहीरीतून पाणी काढत असताना त्याची बकेट विहीरीत पडली. ती बकेट काढण्यासाठी तो विहीरीत उतरला. मात्र त्याचा पाय घसरुन तो पाण्यात पडला. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. नागोराव लक्ष्मण सोळंके यांच्या माहितीवरुन किनवट पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस हवालदार श्री. पांढरे करत आहेत.

 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Threatening To The Inspectors In The Quarantine Room Nanded News