
या प्रकरणात नांदेड पोलिसांनी दिल्लीत जाऊन सोमवारी (ता. १८ ) संशयितास तर बुधवारी (ता. २०) आणखी दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नांदेड : शहरातील वजिराबाद परिसरात असलेल्या आयडीबीआय बँकेच्या शाखेतून शंकर नागरी सहकारी बँकेच्या खात्यातील 14 कोटी 46 लाख 46 हजार रुपयांची रक्कम आरटीजीएसच्या माध्यमातून अज्ञात हॅकरने परस्पर वळते करुन घेतले होते. या प्रकरणात नांदेड पोलिसांनी दिल्लीत जाऊन सोमवारी (ता. १८ ) संशयितास तर बुधवारी (ता. २०) आणखी दोन महिलांना ताब्यात घेण्यात आले आहे. या तिघांची कसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
नविन मोंढा भागातील माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्या शंकर नागरी सहकारी बँकेच्या आयडीबीआय बँकेतील खात्यातून 14 कोटी 46 लाख 46 हजार रुपये खाते हॅक करुन अज्ञात 289 खात्यामध्ये वळविण्यात आले होते. या प्रकरणात वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. तपासादरम्यान सीमावर्ती भागातील काही लोकांचा यात सहभाग असल्याचे समजल्यानंतर पथकाने दिल्ली येथून एका संशयीत व्यक्तीला ताब्यात घेतले. आणि त्याची प्रवास पोलिस कोठडी मिळवून नांदेडच्या दिशेने निघाले आहेत.
हे पथक आज गुरुवारी (ता. २१) सायंकाळपर्यंत नांदेडला पोहोचणार आहे. कर्नाटकच्या शेजारी असलेल्या नांदेड लगतच्या एका जिल्ह्यातून एक महिला दुसऱ्या पथकाने ताब्यात घेतली असून तिच्या दुसऱ्या सहकारी महिलेलाही ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. या महिलेचे नायजेरियन फ्रॉड करणाऱ्या अनेक लोकांची घनिष्ठ संबंध असल्याची चर्चा आहे. ही महिला एका शाळेतील मुख्याध्यापिका असल्याचे सांगितले जाते. तिच्यासह एका महिलेचा या गुन्ह्यातील सहभाग अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांनी त्यांना मिळालेल्या माहितीवरुन दोघींनाही ताब्यात घेतले आहे.