नांदेडमध्ये थरार : शिवाजीनगरच्या व्यापाऱ्यावर वजिराबादमध्ये प्राणघातक हल्ला

प्रल्हाद कांबळे
Monday, 18 January 2021

या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली. याबाबत वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेड : शिवाजीनगर येथील फर्निचरचे व्यापारी विजय दत्तात्रय गड्डम (वय 50) यांच्यावर अनोळखी तीन जणांनी तलवारीने प्राणघातक हल्ला केला. ही घटना ता. 16 जानेवारीच्या रात्री आठच्या सुमारास शासकीय आयुर्वेद महाविद्यालयासमोर घडली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली. याबाबत वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील शिवाजीनगर भागातील फर्निचरचे व्यापारी विजय गड्डम हे ता. 16 जानेवारीच्या रात्री आठ वाजताच्या सुमारास वजिराबाद परिसरात असलेल्या आयुर्वेदिक महाविद्यालय समोरील श्री भगत यांच्या पानठेल्यावर पान खाण्यासाठी थांबले होते. यावेळी अनोळखी तीन व्यक्ती त्या ठिकाणी आले. त्यांनी श्री गड्डम यांच्याशी वाद घातला. धक्काबुक्की केली, एवढेच नाही तर तिघांपैकी एकाने तलवारीने त्यांच्या कपाळावर जबर वार केला. यात श्री. गड्डम यांच्या नाकाला, हाताला, पोटाला आणि छातीवर जबर दुखापत झाली. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरुन पसार झाले.

हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात तूर विक्रीसाठी एक हजार ७४४ शेतकऱ्यांची नोंदणी

श्री. गड्डम यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सर्वत्र धावाधाव झाल्याने हे तिघेही हल्लेखोर दुचाकीवरुन पसार झाले. जखमी अवस्थेत विजय गड्डम हे वजिराबाद पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यांना तातडीने पोलिस निरीक्षक संदीप शिवले यांनी शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिस फौजफाटा सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. सीसीटीव्ही फुटेज तपासले मात्र त्यात हल्लेखोर स्पष्ट दिसत नव्हते. त्यानंतर त्यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिसांनी तीन अनोळखीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. तपास पोलिस उपनिरीक्षक श्री पन्हाळकर करत आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा नांदेडच्या व्यापाऱ्यांमध्ये भितचे वातावरण पसरले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Thrill in Nanded: Assassination of a Shivajinagar trader in Wazirabad nanded news