सायफळ कोळी शिवारात पट्टेरी वाघाची दहशत; झाडावर जाऊन बसल्याने सलगड्याचा वाचला जीव

The tiger is roaming freely in Saifal Koli Bechirag area of ​​Mahur taluka.jpg
The tiger is roaming freely in Saifal Koli Bechirag area of ​​Mahur taluka.jpg

नांदेड : माहूर तालुक्यातील सायफळ, कोळी (बेचिराग) शिवारात पट्टेरी वाघाचा मुक्त वावर होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून रविवारी सायंकाळच्या सुमारास शेतातून परतत असलेल्या बैलांवर हल्ला करण्याच्या हेतूने वाघाने चाल केल्याची घटना समोर आली आहे. सलगड्याने प्रसंगावधान राखून गाडीला जुंपलेले बैल सोडून दिले व झाडावर शरण घेतल्याने सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

नांदेड जिल्ह्यातील माहूर व यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्याच्या सीमावर्ती भागातून वाहणाऱ्या पैनगंगा नदीच्या दोन्ही बाजूला जंगल व्याप्त अरण्य आहेत. अस्वल, रानडुक्कर, कोल्हे, लांडगे, अजगर व विषारी सर्प इत्यादी हिंस्र प्राण्यांचा मुक्त संचार शेतकऱ्यांसाठी नित्याचीच बाब आहे. परंतु आता या परिसरात पट्टेरी वाघाची दहशत शेतकऱ्यांना भीतीचे प्रमुख कारण बनले आहे. रविवारी सायंकाळच्या सुमारास जयराम मिश्रा यांच्या शेतावरील सालगडी विजय मऱ्हसकोल्हे हा शेतातून बैलगाडीत गवत घेऊन निघाला असता वाघाने डरकाळी फोडली आणि बैलांच्या दिशेने चाल करत येत असल्याचे पाहून साल गड्याने गाडीला जुंपलेले बैल सोडून दिले. तोच बैलांनी घराकडे धूम ठोकली. तर सालगड्याने नजीकच असलेल्या झाडावर जाऊन बसल्याने पुढील अनर्थ टळला. 

घटनेची माहिती मिळताच माहूर वनविभागाचे वनपाल एम.बी.राठोड, वनरक्षक एस.के.तीळेवाड, यु.जी.सोनटक्के, एम.एस.भुजबळ, डी.एस.बिडगर व वन्यजीव रक्षक मोहन मुर्खे आदींनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. तत्पूर्वी (ता.१२) नोव्हेंबर रोजी मांसभक्षी वन्य प्राण्याने याच शिवारातील अमोल गावंडे या शेतकऱ्याच्या एक वर्षाच्या गाईचा फडशा पाडला होता. तर पंधरा दिवसाआधी येथील गुराखी भीमराव मडावी याला गोकुळ व सायफळच्या मधातील व पैनगंगा नदी परिसरातील जंगलात एक वयस्क वाघासोबत दोन बछडे वावरत असताना दिसून आले होते. एकंदरीत पट्टेरी वाघाच्या मुक्त संचारामुळे सायफळ कोळी शिवारातील शेतकऱ्यांत प्रचंड भीतीचे वातावरण असून वनविभागाने वाघाचे बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

सायफळ शेत शिवारात मागील अनेक दिवसापासून वाघाचे दर्शन प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष होत आहे. बहुदा हे वाघ नदीच्या पलीकडील क्षेत्रातून येत असावा. सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडलेल्या घटनेची पाहणी व टायगर सर्चिंग मोहिमेवर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबत मी देखील गेलो होतो. भयभीत सालगडयाला दिसून आलेला तो हिंस्र प्राणी पट्टेरी वाघाच होता. वनविभागाने त्याला पायबंद करण्यासाठी जाळीच्या साह्याने किंवा पिंजर्‍यात कैद करून इतरत्र मोठ्या जंगलात सोडावे, अशी मागणी गावातील शेतकरी करत आहे.
- मोहन मूर्खे- वन्यजीव रक्षक, सायफळ.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार सायफळ व आसपासच्या परिसरात वाघाचा वावर आहे. नदीला पाणी नसल्यामुळे पलीकडून तो इकडे येत असावा. वाघ प्राणी एका ठिकाणी स्थिर राहत नसल्याने सध्या त्याचा बंदोबस्त करण्यासाठी आमच्याकडे कुठलाही उपाय नाही. शेतकऱ्यांनी सावध राहावे, पाळीव प्राण्यांचे नुकसान झाल्यास त्यांना मदत मिळवून देऊ.
-बी.पी.आडे- वनपरिक्षेत्राधिकारी (प्रा.), माहूर.

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com