नांदेडमध्ये वाळूची तस्करी करणारा टिप्पर उलटला, दहा जण गंभीर जखमी 

गंगाधर डांगे
Saturday, 24 October 2020

गोदाकाठच्या भागांमध्ये हैदोस मांडला असून गोदावरीच्या काठावर असलेल्या प्रत्येक शेतामध्ये व शासकीय जमिनीवर वाळूमाफियांनी मोठमोठाले अवैध साठे केलेले पहायला मिळतात. ही साठेबाजी आज या अपघातामुळे समोर आली आहे. 

मुदखेड (जि. नांदेड) : तालुक्यातील वाळूमाफियांनी महसूल प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली असून शनिवारी (ता.२४) महाटी तालुका मुदखेड येथे वाळूने भरलेला तस्करी करत असलेला हायवा टिप्पर पलटी खाल्याने दहा मजूर गंभीर जखमी झाले आहेत. 

मुदखेड तालुक्यातील महसूल प्रशासनाच्या मेहर नजरेमुळे संपूर्ण जिल्ह्यातील वाळूमाफियांनी मुदखेड तालुक्यातील वासरी, आमदुरा, महाटी, माळकौठा, टाकळी, चिलपिंपरी, खुजडा, शंखतीर्थ या गोदाकाठच्या भागांमध्ये हैदोस मांडला असून गोदावरीच्या काठावर असलेल्या प्रत्येक शेतामध्ये व शासकीय जमिनीवर वाळूमाफियांनी मोठमोठाले अवैध साठे केलेले पहायला मिळतात. ही साठेबाजी आज या अपघातामुळे समोर आली आहे. 

हेही वाचा - परभणी : कार व ट्रकच्या अपघातात तीन मुलांसह नऊजण जखमी, वाहतुक विस्कळीत

मुदखेड तालुक्यात वाळूचे साठे असल्याने वाळूमाफियांनी या साठवणूक केलेल्या वाळूची वाहतूक नांदेड शहरासह इतर भागात मोठ्या प्रमाणात सुरू ठेवलेली आहे. आज महाटी, शंखतीर्थ परिसरातून वाळूने भरलेली हायवा टिप्पर अवैधरित्या नांदेडकडे वाहतूक करीत असताना महाटी माळकौठा दरम्यान पलटी खाल्याने या टिप्परवर असलेले कामगार मोठे जखमी झाले असून कोणाचा पाय तर, कोणाचा हात तुटला असून असे एकूण दहा कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

हे देखील वाचाच - जंगल गस्तीत अवैध वृक्षतोडीचे 49 सागवान नग वन विभागाने केले जप्त

पोटासाठी पायपीट करणाऱ्या कामगारांना तालुक्यातील महाटीच्या रस्त्यावर चांगलीच भोगावी लागल्याचे दिसून आले. या मुळे अवैध वाळूच्या वाहतुकीचे थैमान कामगारांच्या जीवावर बेतले असल्याचे हादरून टाकणारे दृश्य आज सर्वांपुढे उभे राहिले आहे. टिप्पर क्र. (एम.एच.१४. ए.एस. ९२१७) हे येळी (ता. लोहा) येथील वाळूचा अवैध धंदा करणाऱ्या एका व्यक्तीचे असल्याचे समजते. सदर टिप्पर माळकौठ्याकडून महाटीकडे जात होते. तेथील वळनावर एन्ट्री केल्यानंतर टिप्पर पलटी झाला व १० जण गंभीर जखमी झाले.

येथे क्लिक कराच -  कोरोना इफेक्ट : मागणीच नसल्याने रंगीबेरंगी फुलांचा बेरंग

अपघातातील जखमींना नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत कायदेशीर कारवाईची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. जखमींमध्ये अंबादास व्यंकटी कांबळे (वय १६), केशव गाढे (वय ३०), तिरुपती नामदेव ढगे (वय ३५), व्यंकटी पवार ड्रायवर (वय २४), नारायण लांडगे (वय ३४), बामन ढगे (वय ३४), केशव कांबळे (वय १६), मोहन टोकलवाड (वय ३६), कैलास पवार (वय ३४) व सुरकतवार (वय ५९) यांचा समावेश आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tipper Carrying Sand Overturned Seriously Injuring Ten People Nanded News