लालपरी धावते, मात्र पोटासाठी सारेच थकले

प्रमोद चौधरी
Saturday, 19 September 2020

एसटी कर्दोमचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन थकल्याने घरात प्रवेश करताना, खर्चाचा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहत आहे. विशेष म्हणजे अशी परिस्थीती असताना, कोणीही कर्मचारी समोर येवून बोलायला तयार नाहीत.

नांदेड : कोरोनामुळे सर्वच जण त्रस्त असताना अशा काळातही आदेश आल्यानंतर आम्ही जीव मुठीत धरून धावलो...आत्ता पगाराचे बघा, अशी विनवणी एसटी कर्मचारी आता करत आहेत. कारम दोन महिन्यांपासून वेतन थकल्याने घरी जावे तरी कोण्या तोंडाने, अशी अवस्था कर्मचाऱ्यांची झाली आहे. 

संपूर्ण राज्यातच एसटी कर्मचाऱ्यांची वेतनाविना परवड होत आहे. जुलै व आॅगस्ट महिन्याचे वेतन सप्टेंबर महिना अर्धा होवून गेलातरी अद्याप जमा झालेले नाही. त्यामुळे खायचे काय? असा प्रश्न या कर्मचाऱ्यांना सतावत आहे.  राज्यात सुमारे एक लाखाच्या जवळपास एसटी कर्मचारी आहेत. कोरोनामुळे एसटी महामंडळाची सेवा काही महिन्यांपूर्वी खंडित झाली होती. त्यामुळे उत्पन्नाचे स्त्रोत घटले होते. त्याचा परिणाम कर्मचाऱ्यांवर झाला. याआधी जून महिन्यापर्यंतचे वेतन थकले होते. परंतु, राज्य शासनाने ५५० कोटी रुपये महामंडळाला दिल्यानंतर जून महिन्यापर्यंतचे वेतन कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा झाले.

हेही वाचा - नांदेड - दूर्धर आजारग्रस्त सेवकाच्या ‘समाजसेवे’ची अखेर

आता आणखी दोन महिन्यांचे वेतन थकले आहे. मुळात कोरोनामुळे एसटीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. सध्या एसटी बसेस सुरु असल्यातरी बसमध्ये केवळ २१ प्रवाशांची वाहतूक करण्यालाच परवानगी होती. मात्र, दोन दिवसांपूर्वी शंभर टक्के प्रवासी वाहतुकीला शासनाने परवानगी दिली आहे. लॉकडाऊनमध्ये एसटी तोट्यात आली. डिझेल आणि मेटेन्नसची कामे या खर्चात भागतात. कर्मचाऱ्यांचे वेतन करता येईल, अशी आर्थिक स्थिती महामंडळाची नाही. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य शासनालाच यात लक्ष घालावे लागणार आहे. दरम्यान दोन महिन्यांचे वेतन थकल्याने घरात प्रवेश करताना, खर्चाचा मोठा प्रश्न कर्मचाऱ्यांसमोर उभा राहत आहे. विशेष म्हणजे अशी परिस्थीती असताना, कोणीही कर्मचारी समोर येवून बोलायला तयार नाहीत.

हेही वाचलेच पाहिजे - नांदेड- बिदर मार्गाचा निर्माण अहवाल प्राप्त, निधी मंजुरीची प्रतिक्षा ​

प्रवाशी भाड्याचा भूर्दंड महामंडळाला
एसटीची आसनसंख्या ४२ असताना केवळ २१ प्रवाशांचीच वाहतूक करण्याची परवानगी दिलेली होती. त्यामुळे उर्वरीत प्रवाशांच्या प्रवास भाड्याचा भूर्दंड महामंडळाला सहन करावा लागला. हे प्रवास भाडे शासनाने एसटी महामंडळाला देण्याची गरज आहे. असे न झाल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न आणखी बिकट होण्याची शक्यता कर्मचाऱ्यांमधून चर्चिली जात आहे.

येथे क्लिक कराच - डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय रुग्णालयासाठी आता दहा हजार क्षमतेच्या ऑक्सीजन टँक

राज्य शासनाने जून महिन्यात एसटी महामंडळाला दिलेले ५५० कोटी रुपये ही काही मदत नव्हती, तर एसटीतून सवलतींवर प्रवास करणाऱ्यांची ती सवलत रक्कम होती; जी राज्य शासनाकडे थकली होती. विशेष म्हणजे आणखी मोठी रक्कम राज्य शासनाकडे थकीत आहे. ती रक्कम महामंडळाला दिल्यास वेतनाचा प्रश्न निकाली निघू शकतो, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tired Two Months Salary Of ST Employees Nanded News