
नांदेड : ‘‘मराठवाड्याच्या विकासासाठी काही वर्षांपासून प्रयत्न करीत आहोत. अजून खूप काम करावे लागेल. येथील सिंचनाचे प्रश्न ऐरणीवर आहेत. याचा सखोल अभ्यास करून यावर काम करण्याचा निर्णय घेतला. एका बाजूला पश्चिमवाहिनी नद्यांतील मुबलक पाणी समुद्राला वाहून जाते. हे पाणी तुटीच्या गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीला सर्वोच्च प्राधान्य देऊ’’, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले. मराठवाडा मुक्तिसंग्राम वर्धापन दिनानिमित्त माता गुजरीजी विसावा उद्यान येथे त्यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. यावेळी ते बोलत होते.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, खासदार हेमंत पाटील, महापौर जयश्री पावडे, जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. फडणवीस म्हणाले, ‘‘मराठवाड्यात जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून जलसंधारणाचे मोठे झाले. यावर आयआयटीने शास्त्रीय बाजू तपासून पाहिल्या. त्यावर त्यांनी अहवाल तयार केला. हा अहवाल उच्च न्यायालयाने स्वीकारला. याबाबत कोणाचे गैरसमज असतील ते दूर करून मोठे काम उभे करता येईल.’’यंदा काही मंडळांत चार-चार वेळा अतिवृष्टी झाली. शेतकऱ्यांना मोठे नुकसान झाले. यातून सावरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आम्हा सर्वांशी तत्काळ चर्चा करून ७५० कोटी रुपये अतिवृष्टीग्रस्तांसाठी देऊ केले. याचबरोबर ६५ मिलिमीटर पावसाची जी मर्यादा होती त्या मर्यादेबाबतही सकारात्मक विचार केला.
देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री