
पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघातील भोकर तालुक्यातील दिवशी येथील घटना, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
भोकर ( जिल्हा नांदेड ) : तेलंगना सिमेलगत असलेल्या दिवशी बूद्रक (ता. भोकर) येथे बुधवारी ( ता. २०) रोजी दूपारी तीन वाजताच्या दरम्यान शेतात सालगड्यानी चार वर्षीच्या निरागस बालीकेवर अत्याचार करुन तिचा गळा आवळून खून केला. मृतदेह गावालगत असलेल्या सूधानदीच्या पात्रात फेकून दिला आहे. पोलिसानी घटनास्थळी भेट देऊन आरोपीला ताब्यात घेऊन बुधवारी रात्री उशिरा भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अमानूष कृत्याचा सर्वस्तरातून निषेध केला जात आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार तेलंगना सिमेवरील दिवशी गावातील आरोपी बाबु ऊकंडु संगेराव (वय ३५) हा शेतात सालगडी म्हणुन कामाला होता. बुधवारी शेतमालकाच्या चार वर्षीय निरागस बालिकेला विश्वासात घेऊन त्याने तिला गावालगत असलेल्या सूधानदी पात्र्याच्या परिसरात नेले आणि जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केला. एवढेच नाही तर या दुष्कृत्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा खून केला. आणि मृतदेह नदीपात्रात फेकून दिला. शेतमालक आणि मालकीन यांनी आपली चिमुकली घरी नाही व सालगडी पण नाही म्हणून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता बालिकेचा मृतदेह विचीत्र अवस्थेत नदीपात्रात आढळून आला.
पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक शंकर डेडवाल आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. संतप्त ग्रामस्थांनी "आरोपीला आमच्या ताब्यात द्या त्याला आम्ही शिक्षा देणार " अशी आक्रमक भूमिका घेतल्याने पोलिसही चक्रावून गेले. आरोपीचा शोध घेतला असता नदिपात्रातच झुडपात लपवुन बसलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. पोलिसानी आरोपीला ताब्यात घेतले आहे. गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलिस उपविभागीय अधिकारी गोपाळ रांजनकर, पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी तात्काळ भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा करुन शांत राहण्याचे आवाहन केले. सध्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडल्याने सर्व स्तरातून निषेध केला जात असून आरोपीला कठोर शासन करावे अशी मागणी जोर धरते आहे. पिडीत बालिकेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
संपादन- प्रल्हाद कांबळे