
लेखिका जयश्री सोन्नेकर यांच्या अल्पजीवी बालकाची चित्तरकथा ‘नीरज’ या पुस्तकाच्या माध्यमातून समोर आली आहे.
‘नीरज’ : मन पिळवटून टाकणारी संघर्षाची शोकात्म कहाणी : डॉ. सुरेश सावंत
नांदेड : निसर्ग काही दुर्दैवी मातापित्यांच्या पदरात जन्मजात दुर्धर आजाराने ग्रासलेली अल्पजीवी बालके टाकतो. त्यामुळे त्यांना अपत्यप्राप्तीचा निर्भेळ आनंदही अनुभवता येत नाही. उलट अशा बालकाचे संगोपन करताना, बालकाच्या मृत्यूसोबत असे दुर्दैवी मातापिता क्षणोक्षणी आपलेही मरण अनुभवत असतात. कारण मृत्यू अशा बालकाच्या सावलीत आश्रयात वावरत असल्याची दाहक जाणीव त्यांना क्षणोक्षणी छळत असल्याचे मत बाल साहित्यिक डॉ. सुरेश सावंत यांनी व्यक्त केले.
जयश्री सोन्नेकर यांच्या ‘नीरज’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले की, लेखिकेच्या अल्पजीवी बालकाची चित्तरकथा ‘नीरज’ या पुस्तकाच्या माध्यमातून समोर आली आहे. सेलूच्या जयश्री विवेक सोन्नेकर यांनी ही चित्तरकथा लिहिली आहे. जयश्री सोन्नेकर या पेशाने शिक्षिका आहेत. त्यांना दोन मुले. पहिली मुलगी नेहा ही आता डाॅक्टर झाली आहे. नेहाच्या पाठीवर जन्मलेला मुलगा नीरज याच्या २० वर्षांच्या संघर्षपूर्ण जीवनाची ही कहाणी लेखिकेने मोठ्या हिमतीने शब्दबद्ध केली आहे. नीरजने आपल्या २० वर्षाच्या उण्यापुऱ्या आयुष्यात मृत्यूशी दिलेल्या संघर्षाची ही एकप्रकारे शोकात्म कहाणी आहे.
हेही वाचा - नांदेड जिल्ह्यात गुडमॉर्निंग पथक कोमात, काय आहे कारण? वाचाच
अन् सुरु झाली आईवडिलांची ससेहोलपट
नीरजच्या जन्मानंतर त्याचे बारसे मोठ्या थाटामाटात झाले. नीरजला पाहायला आलेल्या डाॅ. कामठकरांनी (मामा) बाळाला पाहून हा एवढ्या वेगात नेहमी श्वास घेतो काः असा प्रश्न विचारला आणि लेखिकेची अपत्यप्राप्तीच्या आनंदाची तंद्री भंगली. तज्ज्ञ डाॅक्टरांना दाखविल्यावर बाळाच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदान झाले. इथून पुढे बाळाची आणि त्याच्या आई-वडिलांची जी ससेहोलपट सुरु झाली, तिचि हृदय विदीर्ण करणारी हकीकर या पुस्तकात आली आहे.
हे देखील वाचाच - Video - कोरोना इफेक्ट : नांदेड जिल्ह्यातील बॅट विक्रेत्यांची वाढली चिंता
१८ प्रकरणांतून केली पुस्तकाची मांडणी
लक्ष्मीकांत तांबोळी यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे हे लेखन म्हणजे करुणामयी नायिकेचे दर्शन घडविणारी वत्सलरसाने व्यास अशी मातृसंहिता आहे. लेखिकेने या पुस्तकाची मांडणी छोट्या छोट्या १८ प्रकरणांमधून केली आहे. प्रकरणांना ‘जिद्दीचा संघर्ष’, ‘निरागस बालपण’, ‘सुगंधाची पखरण’, ‘आगाऊ कुठला’, ‘पिलाची तगमग’, ‘गोड गोजिरा बटू’, ‘प्रतिमेशी संवाद’, ‘सौंदर्य टिपणारी नजर’, ‘अश्रूंचा डोह’, ‘मैत्र जीवाचे’, ‘प्रेमाचा चहा’, ‘संवेदनशील तळमळ’, ‘प्रवास आनंदाचा’, ‘दर्दभरी दास्ताॅ’, ‘खट्याळ नातू’, ‘माणूसवेडा’, ‘वेदनेपलीकडची शांतता’, ‘अपराजित योद्धा’ अशी मोठी अन्वयर्थक शीर्षके दिलेली आहेत. संपूर्ण वाचून संपल्याशिवाय पुस्तक सोडवत नाही.
मृत्यूच्या छायेत वावरणाऱ्या मातृत्वाची बखर
लेखिकेची भाषा अतिशय साधी, सोपी, प्रवाही, अलंकारविरहित तरीही ओघवती आहे. नीरज या पुस्तकात दुर्धरात फुललेल्या कमळाचा परिमळ पुस्तकाच्या पानोपानी दरवळत राहतो आणि म्हणूनच नीरज म्हणजे मृत्यूच्या छायेत वावरणाऱ्या मातृत्वाची बखर आहे, असे म्हणावेसे वाटते.
- डाॅ. सुरेश सावंत, नांदेड