बहुप्रतीक्षित मनिरामखेड प्रकल्प पुनर्वसित गावठाणच्या नागरी सुविधा हस्तांतरित; प्रकल्पाची घळभरणी पूर्ण

file photo
file photo

वाई बाजार ( जिल्हा नांदेड) : माहूर तालुक्यातील बहुप्रतिक्षित तसेच बहुचर्चित मनिरामखेड सिंचन प्रकल्पाची घळभरणीचे काम पूर्ण झाल्याने पुनर्वसित वायफणी गावाचे पुनर्वसन करुन नवीन वसाहतीत जलसंपदा विभागामार्फत निर्माण करण्यात आलेल्या नागरी सुविधा आज (ता. सहा) रोजी नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटणकर, सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तीकिरण पुजार, पुनर्वसन उपजिल्हाधिकारी दिपाली मोतीयेळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, तहसीलदार राकेश गिड्डे, जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता दिलीप इंगोले, विष्णुपुरी प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता आदींच्या उपस्थितीत नागरी सुविधांचे हस्तांतरण करण्यात आले.

नांदेड जिल्ह्याच्या गोदावरी खोर्‍यातील पैनगंगा उपखोर्‍यात माहूर तालुक्यातील मनिरामखेड येथे उभारण्यात येणाऱ्या  प्रकल्पातून ११. ८६६ दलघमी एवढ्या प्रमाणात उपलब्ध होणाऱ्या पाणी साठ्यातून वसराम नाईक तांडा, सिंदखेड, रामपुर, चिंचखेड, सतीगुडा, लोकरवाडी, वायफणी, करंजी, धानोरा, पाथरी या गावातील बाराशे हेक्टर्स पेक्षा अधिक जमिनीला त्याचा फायदा होणार आहे. माहूर तालुक्यातील पाचशे चोवीस इतक्या लोकसंख्येच्या वायफणी गावाचे पुनर्वसन करुन हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात आला आहे. परिसरातील फ्लोराईडयुक्त पाण्याचा शाप लागलेल्या अनेक गावचा पाणी प्रश्न निकाली निघेल अशा महत्व पूर्ण प्रकल्पाची घळभरणीचे काम पूर्ण झाले असून येत्या पावसाळ्यात या प्रकल्पात मोठा जलाशय निर्माण होणार आहे.

वायफणी- मनिरामखेडच्या स्थानिक नाल्यावर उभारण्यात येणाऱ्या मनिरामखेड प्रकल्पास गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, औरंगाबाद कडून २०१९ मध्ये द्वितीय सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर पुनर्वसन कामात तरतूद केल्या नुसार १७ कामे स्थानिक गुत्तेदार यांच्या माध्यमातून करण्यात आले. पुनर्वसित वसाहतीमधील नागरी सुविधा निर्माण करताना कंत्राटदाराने अत्यंत निकृष्ट दर्जाची विकास कामे केल्याची ओरड नागरिकांनी आज अखेरपर्यंत जिल्हाधिकाऱ्यांना बोलून दाखवली. प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या त्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्यासाठी व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपिन ईटणकर देखील प्राधान्यक्रम देत असल्याचे दिसून आले.

मावेजा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना थेट भेटा

जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी प्रकल्पबाधित नागरिकांच्या सूचना, तक्रारीचा निपटारा करुन घरकुल, शौचालय आदी योजनांचा तातडीने लाभ देण्याच्या सूचना करुन अपूर्ण कामे विहित कालावधीत पूर्ण करून देण्याची हमी दिली. तसेच शेती व निवासी जागे संदर्भातीलप्रलंबित प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन थेट भेटा मी व्यक्तीश: प्रकरण सोडवेल अशी ग्वाही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी दिल्यानंतर प्रकल्प बाधितांच्या चेहऱ्यावरील नैराश्य दूर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुनर्वसन विभाग द्वारा आयोजित नागरी सोयी- सुविधा हस्तांतरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मागण्या विषयक निवेदन माणिकराव पाटील व सरपंच नारायण खूपसे यांनी सादर केले. नागरी सुविधा सुविधा हस्तांतरण कार्यक्रमादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके यांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com