तुरीचे पीकही देणार शेतकऱ्यांच्या हातावर तुरी

nnd07sgp07.jpg
nnd07sgp07.jpg


कुरुळा, (ता. कंधार, जि. नांदेड) ः अचानक वातावरणातील बदल, पर्जन्य अनियमितता बदलते ऋतुचक्र या मुळे यंदाच्या खरीप हंगामातील उत्पन्नाच्या सर्व आशा आता मावळल्या असून कापूस, सोयाबीनपाठोपाठ आता तूर उत्पन्नावरही गंडांतर आले असल्याचे चित्र आहे. मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे आता तुरीही शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देण्याच्या तयारीत आहेत. एकूणच खरीप हंगामाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांकडे पाठ फिरवल्याचे दृश्य आहे. 

नुकसानभरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांतुन मागणी 
कुरुळा व दिग्रस मंडळात मोठ्या प्रमाणात आंतरपीक व काही ठिकाणी मुख्य पीक म्हणून तुरीची लागवड केली आहे. यंदा कुरुळा व दिग्रस मंडळात १९०४ हेक्टरवर तुरीची लागवड करण्यात आली आहे. कापूस, सोयाबीन आणि तुरीच्या उत्पन्नावरच येथील शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असल्याने महामारीबरोबरच पिकावर आलेल्या संकटामुळे शेतकरी पुरता गांगारून गेला आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे सोयाबीनची नासाडी झाली, तर कापसाच्या वाती झाल्या, बोंडे सडली, एका वेचणीतच पराट्या झाल्या. यामु ळे तुरीचे पीक तरी काही अंशी आधार देईल अशी अपेक्षा असतानाच मोठ्या प्रमाणात मर रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. एकूणच खरीपाने बळीराजाची ओटी खंगाळली असून तूर पिकांचे पंचनामे होऊन नुकसानभरपाई मिळावी अशी शेतकऱ्यांतुन मागणी होत आहे. 

आर्थिक आधार व्हावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा
यंदाचे अर्थचक्र कोलमडल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता पिकविम्यावर आहेत. बाधित पिकांच्या नुकसाणीसंदर्भात अत्यल्प शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रारी केल्या होत्या केवळ अश्यानाच विम्याचा लाभ मिळाला परंतु ऑनलाइन तक्रारी पासून अनभिज्ञ असणारे मोठ्या प्रमाणात शेतकरी वंचित आहेत. लवकरात लवकर विम्याच्या रूपाने जगण्यासाठी आर्थिक आधार व्हावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. 

उडम बुरशीमुळे मर रोगाचा प्रादुर्भाव होत असून या मुळे पाने पिवळी पडून पिकांचे नुकसान होते. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उन्हाळ्यात खोलवर नांगरटी करावी, मर व वांझ रोगप्रतिकारक्षम व कमी संवेदनशील जातीची पेरणी करावी तसेच एकाच ठिकाणी वारंवार तुरीचे पीक घेण्याचे टाळावे. असे रमेश देशमुख, कृषी अधिकारी कंधार यांनी सांगितले. 

संपादन - स्वप्निल गायकवाड
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com