दोन दिवसांनंतर नांदेडला पुन्हा धक्का, एका पॉझिटिव्ह रुग्णाची भर, संख्या गेली ९८ वर

शिवचरण वावळे
Tuesday, 19 May 2020

करबलानगर येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ९८ वर.

नांदेड : सोमवारपर्यंत प्रलंबित असलेल्या १८२ संशयित अहवालापैकी मंगळवारी (ता. १८) सकाळी २४ अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २३ अहवाल निगेटिव्ह तर करबलानगर येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता ९८ वर जाऊन पोहचली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली.

शनिवार आणि रविवार हे दोन दिवस नांदेडकरांसाठी खुशालीचे दिवस गेले. मात्र काही जणांचा स्वॅब अहवाल येणेबाकी होते. त्यामुळे नांदेडकरांची चिंता कायम होती. सोमवार (ता. १८) सायंकाळी पाचपर्यंत एकूण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे एक लाख १९ हजार ६११ व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी दोन हजार ७०२ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले होते. दोन हजार ४२० स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे. तर एकुण १८२ चा अहवाल प्रलंबित होता. या १८२ प्रलंबित अहवालापैकी मंगळवारी सकाळी २४ अहवाल प्राप्त झाले. यामध्ये २३ अहवाल निगेटिव्ह तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत एकुण स्वॅब पैकी ९८ तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोनावर मात केल्याने ३० रुग्णांना रुग्णालयातून सुटी दिली आहे. 

हेही वाचा -  नांदेडच्या दारु दुकानावर ग्राहकांची स्‍क्रीनींग

६१ रुग्णांवर उपचार सुरू

उपचार सुरु असलेल्या ६१ रुग्णांपैकी १० रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड येथे तर पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे ४८ रुग्ण आणि बारड ग्रामीण रुग्णालय येथील धर्मशाळेत कोवीड केअर सेंटरमध्ये दोन रुग्णांवर औषधोपचार सुरु असून नव्याने पॉझिटिव्ह आलेला रुग्ण कुठल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आला आहे याबद्दल बातमी पूर्ण होईपर्यंत माहिती उपलब्ध झाली नव्हती. उपचार सुरू असलेल्या सर्व ६१ पॉझिटिव्ह रुग्णांची सद्य: स्थिती स्थिर आहे. 

आजपर्यंतपाच रुणांचा मृत्यू 
 
औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे एकुण पॉझिटिव्ह पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून या रुग्णांना रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी.
जनतेनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये व प्रत्येक नागरिकांनी मोबाईलमध्ये “आरोग्य सेतू ॲप” डाऊनलोड करुन घ्यावा, जेणेकरुन आपल्या सभोवती कोरोना बाधित रुग्ण असल्यास आपणास या ॲपद्वारे सतर्क राहण्यास मदत मिळेल, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Two days later, Nanded was hit again, with one positive patient, bringing the number to 98 nanded news