विष्णुपूरीचे दोन दरवाजे उघडले, सावधानेतचा इशारा

प्रल्हाद कांबळे
Monday, 12 October 2020

सोमवारी (ता. १२) सकाळी दहा वाजता विष्णुपूरी उपसा जलसिंचन प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहे.

नांदेड : मागील आठ दिवसांपासून गोदावरी नदीच्या पानलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु आहे. परतीच्या पावसाने मराठवाड्यात शेतकऱ्यांपुढे मोठे संकट ऊभे केले आहे. हाताला आलेला मुग व सोयाबीन या पावसाने हिरावले. मराठवाड्यातील सर्व मोठे, मध्यम व लहान धरणे भरली आहेत. सतत भरलेल्या या धरणांतून पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. पुन्हा जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडल्याने पाण्याची आवक वेगाने होत असल्याने सोमवारी (ता. १२) सकाळी दहा वाजता विष्णुपूरी उपसा जलसिंचन प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. या दरवाजातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाठबंधारे विभागाने दिला आहे. 

मराठवाड्यातून राज्याची सर्वात मोठी वाहणारी गोदावरी नदी पुढे तेलंगनात जाते. त्यामुळे या नदीवर अनेक लहान मोठे बंधारे उभारण्यात आले आहेत. त्यात पैठण येथील जायकवाडी आणि विष्णुपूरी हे दोन मोठे प्रकल्प आहेत. जायकवाडी धरण या वर्षी पडणाऱ्या जोरदार पावसाने शंभर टक्के भरले आहे. लगातार या धरणातून पाण्याचा पाण्याचा गोदावरी नदी पात्रात केल्या जात आहे. पुन्हा परतीच्या पावसाने मराठवाड्यात जोरदार आगमन केले आहे. या पावसाने मराठवाड्यातील खरीप हंगाम होता नव्हता ते हिरावून घेतला. या पावसाने शेतकरी हवालदिल झाले आहेत. सोयाबीन गेल्यानंतर आता पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणारा कापूस हा काळवंडला आहे. पुन्हा दोन दिवस हवामानशास्त्राने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. 

हेही वाचा -  बदलत्या जीवनशैलीमध्ये ज्येष्ठांचा होतोय कोंडमारा -

जायकवाडीतून पाणी नांदेडकडे झेपावले

जायकवाडी धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आल्याने गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. हे पाणी नांदेडला पोहचण्यासाठी कमीतकमी २४ तास लागतात. इकडे विष्णुपूरी धरणही शंभर टक्के भरलेले असल्याने जायकवाडीचे पाणी धरणात येण्यापूर्वी पाटबंधारे विभागाने विष्णुपूरी धरणाचे दोन दरवाजे उघडले आहेत. त्यात गेट क्रमांक एक आणि सहाचा समावेश आहे. नदी दुथडी भरुन वाहत असल्याने मच्छीमार, विटभट्टी कामगार, शेतकरी व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The two doors of Vishnupuri opened, a warning nanded news