esakal | देगलूरचे दोन युवक बनले प्रशासकीय अधिकारी
sakal

बोलून बातमी शोधा

degloor

महाराष्ट्र नागरी स्पर्धा परीक्षेत देगलूर तालुक्यातील खुतमापूर, नरंगलने झेंडा फडकावला आहे. यामध्ये ‘डीवायएसपी’पदी डॉ. समाधान पाटील तर कक्ष अधिकारीपदी शेख फैय्याज यांची निवड झाली आहे. 

देगलूरचे दोन युवक बनले प्रशासकीय अधिकारी

sakal_logo
By
अनिल कदम

देगलूर ः प्रशासकीय सेवेतूनही समाजात चांगला बदल घडवला जाऊ शकतो हे मी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी व प्रवीण गेडाम यांच्या कामातून बघितले होते आणि त्याच वेळी मी माझ्या मनी निश्चय केला की स्पर्धात्मक परीक्षेला सामोरे जायचे. प्रारंभी पदरी अपयश पडले असले तरी मी खचलो नाही. कुटुंबाचा पाठिंबा, मित्रांच्या सहकार्यातून खडतर प्रवासातून मला पोलिस उपाधीक्षक पदापर्यंत जाता आले. या प्रवासात माझे अल्पशिक्षित आई-वडिलांसह काकांचेही मोलाचे योगदान मिळाल्याची भावना एमपीएससीमध्ये राज्यात बाविसाव्या क्रमांकाने यशस्वी ठरलेल्या खुतमापूर (ता. देगलूर) येथील डॉ. समाधान माधवराव पाटील यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केली.

कर्नाटक, तेलंगणा सीमेवरील खुतमापूर इथेच माझे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले. कुटुंबात कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना आई-वडिलांचे प्रोत्साहन, काकांचे मार्गदर्शन यामुळे आमच्या कुटुंबातील दुसरी पिढी शिक्षणामध्ये नेहमी सातत्य ठेवण्याचा प्रयत्न केल्यानेच आज आमच्या कुटुंबात चार पुरुष व एक महिला वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून या क्षेत्रात कार्यरत आहेत. स्पर्धा परीक्षेला जाण्यासाठी सर्वच पातळीवर सक्षम असावे लागते. यासाठी मी प्रारंभी वैद्यकीय शिक्षणानंतर कडूस (ता.खेड, जि.पुणे व कराड, जि. सातारा) येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले. मात्र, माझे ध्येय नागरी सेवेकडे असल्याने मी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवली होती. या वेळी मला पोलिस उपाधीक्षक पदापर्यंत पोचता आले. मात्र, पुढील ध्येय यूपीएससीचे असल्याचे डॉ. पाटील यांनी या वेळी सांगितले.

हेही वाचा - नांदेडच्या युवकांचा स्पर्धा परिक्षेत डंका...

कठोर परिश्रमाची तयारी ठेवावी
ग्रामीण भागातील मुला-मुलींनी न्यूनगंड न बाळगता स्पर्धा परीक्षेकडे वळावे. शेतीवर अवलंबून असणाऱ्यांची संख्या वरचेवर वाढत चालल्याने शेती क्षेत्रही वरचेवर घटत चाललेले आहे. त्यासाठी शेतीवरील बोजा कमी करणे ही काळाची गरज ठरत आहे. क्षेत्र कोणतेही असो, यात कठोर परिश्रमाची तयारी ठेवली तर यश निश्‍चित पदरी पडेल, असे सांगताना त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पारदर्शकता, सातत्य, निर्णयक्षमता या त्रिसूत्रीचा वापर करून निवडलेल्या क्षेत्रात स्वतःची प्रगती साधावी, असे आवाहन शेवटी केले.

हेही वाचा - नांदेडमध्ये लाॅकडाउन काळात दिव्यांगांची थट्टा - कोण म्हणतंय? वाचा  

समाजाची सेवा करण्याचे स्वप्न पुर्ण 
आमच्या घराण्यात प्रशासकीय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नाही. मात्र, गेल्या चाळीस वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याने आपल्या कुटुंबातील मुलांनीही प्रशासकीय क्षेत्रात येऊन समाजाची सेवा करावी, असे मला वाटत होते. ते स्वप्न माझे पुतणे डॉ. समाधान पाटील यांनी आज पूर्ण केले. हा आमच्या कुटुंबासाठी मोठा आनंदाचा दिवस होय.
- बाबू पाटील खुतमापूरकर, माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, हणेगाव.


शेख फैय्याज शेख मुनीर बनले कक्ष अधिकारी
वडील शिक्षकी पेशात होते, तर वडील बंधू पोलिस उपनिरीक्षक असल्याने मला लहानपणीच वाचनाची आवड लागली, त्यातच मी लोणेरे येथून कॉम्प्युटर इंजिनअरिंग केले, त्यानंतर स्पर्धा परीक्षेकडे वळलो. प्रारंभी केंद्रिय सेवेच्या इंटलिजनस ब्युराेमध्ये एसीआयओ म्हणून माझी निवड झाली. त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये शाखाधिकारीपदी ही निवड झाली होती. पण नागरी सेवामधूनच आपण समाजाची सेवा करू शकतो, ही भावना माझ्या मनात होती. माझे वडील बंधूच स्पर्धा परीक्षेचे आयडॉल असल्याने त्यांच्या पाठिंब्यामुळेच कक्ष अधिकारी या पदापर्यंत पोचता आले, अशी भावना नरंगल (ता. देगलूर) येथील शेख फैय्याज शेख मुनीर यांनी व्यक्त केली.
स्पर्धा परीक्षेतून त्यांची मंत्रालयात कक्ष अधिकारीपदी नुकतीच निवड झाली. त्यानंतर त्यांनी ‘सकाळ’कडे आपल्या भावना व्यक्त केल्या. पूर्वी आलेल्या दोन संध्या मी सोडलो असलो तरी या पदावर रुजू होणार असून माझे सुद्धा ध्येय केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे असल्याचे श्री. शेख फयाज यांनी ‘सकाळ'शी बोलताना सांगितले.


कुटुंबासाठी सोनेरी दिवस
अत्यंत कठीण परिस्थितीमधून मी तिन्ही मुलांना उच्चशिक्षित केले. आज वेगवेगळ्या क्षेत्रात ते कार्यरत असून ते समाजासाठी निश्चितच चांगले काम करतील. शेख फयाजच्या या यशाने आजचा दिवस आमच्या कुटुंबासाठी सोनेरी दिवस आहे.
- शेख मुनीर, सहशिक्षक, आलूर.