esakal | उद्धवा, राष्ट्रवादी व कॉँग्रेसच्या पिंजऱ्यातून बाहेर पडा, केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले

बोलून बातमी शोधा

Nanded News}

अजूनही संधी गेलेली नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भिमशक्तीसोबत यावे असे स्पष्ट आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

उद्धवा, राष्ट्रवादी व कॉँग्रेसच्या पिंजऱ्यातून बाहेर पडा, केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले
sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड :  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भिमशक्ती व शिवशक्ती अखंडीत राहावी असे स्वप्न होते. परंतु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी भिमशक्तीला सोडून राष्ट्रवादीसोबत युती जोडून त्यांच्या पिंजऱ्यात अडकून गेले. मात्र, अजूनही संधी गेलेली नाही त्यांनी भिमशक्तीसोबत यावे असे स्पष्ट आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

नांदेड जिल्ह्यातील जामगा शिवणी (ता.लोहा) येथील पिडीत कुटुंबियांची भेट घेण्यासाठी आले असता ते मंगळवारी (ता. दोन) पत्रकारांसोबत बोलत होते. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे हे सद्यस्थितीत मवाळ झाले आहेत. याला कारणही आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात ते अडकून पडले आहेत. त्यांना समाजहिताचे कुठलेही निर्णय घेता येत नाही. नुकतेच कॉँग्रेसला आक्रमक नेते नाना पटोले यांची प्रदेशाध्यक्षपदी मिळाले आहेत. त्यामुळे तीन आघाड्याची सत्ता आता जास्त काळ टिकणार नाही. त्यामुळे अजूनही संधी गेलेली नाही, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचे स्वप्न कायम ठेवण्यासाठी भिमशक्तीसोबत यावे, असे स्पष्ट आवाहन रामदास आठवले यांनी केले.

हेही वाचा - आपल्या व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेत शेजाऱ्यांशी बांधीलकी ठेवा- प्रमोदकुमार शेवाळे

दरम्यान त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांसोबत संवाद साधला. समाजामध्ये जातीय भेदाभेद थांबवायचा असेल तर आंतरजातीय विवाहाला चालना देण्याची गरज आहे. त्यासाठी शासनासोबतच स्वयंसेवी संस्थांनी पुढे आले पाहिजे. बाळासाहेब आंबेडकर यांनी वंजित बहुजन आघाडी नावाने स्वतंत्र पक्ष निर्माण केला आहे. त्यांचा हा प्रयत्न चांगला आहे. परंतु, एकही उमेदवार निवडून आलेला नाही. सर्व समाजाला एकत्रित करण्यासाठीच रिपब्लिकन पक्ष आहे. सर्व जातीतील लोकांना रिपब्लिकन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यापुढेही असणार आहे. त्यामुळे सर्वसमवेशक पक्ष होण्यासाठी बाळासाहेबांनी रिपब्लिकन पक्षासोबत यावे, असेही श्री. आठवले यांनी स्पष्ट केले आहे.

हे देखील वाचलेच पाहिजे - नांदेड : माळाकोळी शिवारात आगीचे तांडव; शेकडो हेक्टरवर पसरली आग, कापूस, चारा जळून खाक
 
पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य द्यावे
नांदेड वाघाळा महापालिकेमध्ये दोन हजार ३५४ स्वच्छता कर्मचाऱ्यांची पदे मंजुर आहेत. प्रत्यक्षात एक हजार ५२४ पदेच भरलेली आहेत. उर्वरीत पदे तातडीने भरावीत अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांना मी दिलेल्या आहेत. शिवाय स्वच्छतेसाठी अद्यावत मशीनरी घेण्याच्या सूचना आठवले यांनी दिल्या आहेत. नवी दिल्लीतील शेतकरी आंदोलन थांबवावे ही शासनाची प्रामाणिक इच्छा आहे. परंतु, स्वतःला शेतकरी नेते म्हणून मिरविणाऱ्यांकडून हे आंदोलन न्यायालयाच्या निर्णयानंतरही सुरुच आहे. केलेले कायदे रद्द केले तर लोकाशाहीला ते चॅलेंज होईल अशी भिती आहे. त्यामुळे लोकशाहीत तडजोडी कराव्या लागतात हे शेतकरी नेत्यांनी विसरता कामा नये, अशी अपेक्षाही श्री. आठवले यांनी व्यक्त केली आहे.

राज्यातील दलितांना संरक्षण द्यावे 
राज्यामध्ये जिल्हा, तालुका तसेच गावागावांमध्ये जातीय द्वेषातून वाद होणार नाही. यासाठी सामाजिक संस्थांसह सर्वपक्षीय नेत्यांनी पुढे आले पाहिजे. जामगा शिवणी येथे झालेल्या घटनेत गणेश एडके गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरु आहेत. क्षुल्लक कारणावरून ही घटना झाली आहे. गावामध्ये सर्व समाजामध्ये सलोखा निर्माण करण्यासाठी मी जामगा शिवणी येथे आलो आहे.
- रामदास आठवले, केंद्रिय सामाजिक न्याय व सशक्तीकरण राज्यमंत्री.