उमरी तालुक्यात सोयाबीन, कापसाची वाट लागली, शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा

प्रल्हाद हिवराळे
Saturday, 17 October 2020

उमरी तालुक्यात कापूस, सोयाबीन, मुग, उडीद, तुर, ज्वारी, हळद या पिकांवर शेतकरीवर्ग अधिक भर देतात. पेरणीच्या सुरुवातीला पिकायोग्य पाऊस पडला. शेतकऱ्यालाही वाटले यंदा सुगी चांगली पिकेल.

उमरी (जिल्हा नांदेड) : उमरी तालुक्यात परतीच्या पावसाने सतत हजेरी लावल्याने हाती आलेले पिकांचे नुकसान झाले असुन सोयाबीन, कापुस, हळद व अन्य पिकांची तर वाट लागली आहे. पेरणी खत- बियानांचा खर्च तरी निघेल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रूचे पाट वाहत आहेत. 

उमरी तालुक्यात कापूस, सोयाबीन, मुग, उडीद, तुर, ज्वारी, हळद या पिकांवर शेतकरीवर्ग अधिक भर देतात. पेरणीच्या सुरुवातीला पिकायोग्य पाऊस पडला. शेतकऱ्यालाही वाटले यंदा सुगी चांगली पिकेल. पण  झाले उलटे. निसर्ग कोपला आणि पावसाची अतिवृष्टी सुरु झाली. होत्याचे नव्हते झाले. पिके हिरवी असलेले पिवळे पडू लागली. कापसाचे पानेही लाल होत गेली. अनेक औषधी फवारणी खर्च झाले पण कोणत्याच पिकांवर फरक पडला नाही. ऐन सणासुदीला तोंडावर बाजारात मुग, उडिद व सोयाबीन पिके पावसाने कोमेजुन गेले तर काही वाहुन गेले. या पिकावर शेतकरी अनेक स्वप्न पाहत होता.ते स्वप्न धूळीला मिळाले. पावसाने हाहाकार माजविला पण लोकप्रतिनिधी व प्रशासन अजुन कोणतीच भुमिका घेत नाहीत. शेतक-यांच्या शेतीचे तात्काळ सर्व्हे करुन निदान नुकसान भरपाई शासनाने तुटपुंजा निधी का होईना दसरा व दिवाळी तरी साजरी होईल असे मत शेतकऱ्यांमधून होत आहे.

शेतकरी ग्रासला असून जगावे तरी कसे

गतवर्षीचा दुष्काळ, बॅंक कर्ज, सावकाराचे कर्ज, यात मुलीचे लग्न, कुंटुबाची परिस्थिती, मुलाचे शिक्षण, कोरोना महामारी, लॉकडाऊनचा दणका अशा अनेक समस्यांना शेतकरी ग्रासला असून जगावे तरी कसे ? असे चित्र शेतकऱ्यांसमोर उभे राहीले आहे. डोळे भरून आले तरीही हुंदके देत स्वतःला सावरत नशीबाला दोष शेतकरी देत राहीला. कसे बसे अर्ध पिक वाया गेल तरी ही अर्ध तरी पदरी पडेल असे वाटू लागले.  मात्र शेतक-याच्या मागचा पिछा सोडला नाही. मुग, उडीदाच्या शेंगा कोमेजून गेल्या, बुरसा चढला सडून गेले. दाळीपुरते सुद्धा पिकले नाही. सोयाबीन हाती आले होते पण परतीच्या सतत  पावसाने झोडपून काढल्यामुळे सोयाबीनला मोडे फुटून शेतात वाया गेली.

बोंडे गळून पडत आहेत

शेतात सोयाबीनचे ढग लावून ठेवले तेही ओल्या अवस्थेत आहेत. ज्वारी पावसाच्या माराने काजळी धरली आहे. कापूस हे पांढरे सोने आता पिवळे पडले आहे. कापसाचे बोंडे किडेले झाले आहेत. बोंडे गळून पडत आहेत. फुटलेला कापूस पाऊसामुळे वेचता येईना एवढे जमिनीमध्ये  पाऊसाने दलदल करुन टाकली. एवढे संकट शेतकऱ्याच्या पदरी पडले. आता शेतक-यांना स्वतांचे घर संसार चालवणे कठीन होत आहे. म्हणून शेतकरी ७ / १२ गहाण ठेवून बँकेत कर्ज घेण्यासाठी बॅंकेचा उंबरठा झीजत दिवसराञ रांगेत बसुन हातात पैसे केंव्हा पडतात याची वाट पाहू लागला. पिककर्ज वेळेवर मिळत नाही. प्रत्येक बँकेत दलालाचा सुळसुळाट आहे. चिरीमिरी दिले तर तेव्हा कुठे फाईल पुढे सरकते. पिक कर्जाचे कामे दलालामार्फत होतात. 

शेतक-यांच्या काही शेतात पिकल नाही

शेतकरी थेट बँकेत गेले तर त्याना कोणी व्यवस्थीत बोलत नाही. त्यांची कर्ज फाईल तीन ते चार महिने धुळखात राहते. बिचारा शेतकरी बॅंकेत चकरा मारून परेशान होतो. यावर अंकुश कोणाचेही राहीले नाही. सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधीचे शेतक-यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष दिसते. शेतक-यांचा धनी कोणी उरला नाही. शेतक-यांच्या काही शेतात पिकल नाही. शेतक-यांच्या डोक्यावर कर्जाचे डोंगर घेवुन शेतकरी फिरतो. घरात लग्नाला आलेली मुलगी घरातच आहे. पिक कर्ज देवुन दिलासा द्यावे  सरकार तरी पिकाची नुकसान भरपाई आर्थिक मदत तातडीने द्यावे. पिक विम्मा शेतक ऱ्याना मिळून द्यावे अशी अपेक्षा शेतकरी वर्ग करीत आहे. एकीकडे केंद्रात भाजप सरकार तर राज्यात महाविकास आघाडी याचे असले तरी साफ सर्वच पक्ष शेतक-याकडे दुर्लक्ष करत आपला पक्ष मजबूत होईल यासाठी कार्यकर्त्याना अनेक पदावर नियुक्त्या देऊन आपल्या पक्षाचा उदोउदो करुन घेण्याचा सपाटा सुरू केला आहे.
 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Umri taluka, soybeans and cotton are waiting, tears in the eyes of farmers nanded news