दूर्दैवी घटना: महिला पोलिस रस्ता अपघातात ठार 

प्रल्हाद कांबळे
Monday, 24 August 2020

या धडकेत आपल्या पतीसोबत दुचाकीवर बसलेल्या महिला पोलिस खाली पडल्या. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागून त्या जागीच ठार झाल्या.

नांदेड : कर्तव्यावर हजर होण्यासाठी निघालेल्या एका महिला पोलिसावर काळाने घाला घातला. त्यांच्या दुचाकीला पाठीमागून भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेत आपल्या पतीसोबत दुचाकीवर बसलेल्या महिला पोलिस खाली पडल्या. यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागून त्या जागीच ठार झाल्या. ही घटना रविवारी (ता. २३) रात्री सातच्या सुमारास पोखर्णी (ता. नांदेड) ते लिंबगाव रस्त्यावर घडली. 

नांदेडच्या पोलिस मुख्यालयातील महिला पोलिस अश्‍विनी शिवाजी लेंडाळे (वय २४) (बन. १४६५) ह्या ताडकळस (ता. पुर्णा) येथून कर्तव्यावर हजर होण्यासाठी पती गणेश आणेराव यांच्यासोबत दुचाकी (एमएच२२-एजे-७६८०) वरुन लिंबागाव मार्गे नांदेडकडे येत होत्या. त्यांची दुचाकी लिंबगाव पासून जवळच असलेल्या पोखर्णी शिवारात सायंकाळी सातच्या सुमारास आली. यावेळी त्यांच्या पाठीमागुन भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या अश्‍विनी लेंडाळे ह्या जोरात खाली पडल्या. यात त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाल्याने यातच त्या जागीच ठार झाल्या. या अपघाता त्यांचे पती गणेस आणेराव हेसुधद्धा गंभीर जखमी झाले. सुदैवाने त्यांच्या डोक्यावर हेल्मेट असल्याने ते बचावले असल्याचे सांगण्यात आले. 

हेही वाचा -  नांदेड जिल्हा गुन्हेगारीमुक्त करणार, प्लॅन तयार- एसपी विजयकुमार मगर

सन २०१७ मध्ये नांदेड पोलिस दलात भरती

महिला पोलिस अश्‍विनी लेंडाळे ह्या सन २०१७ मध्ये नांदेड पोलिस दलात भरती झाल्या होत्या. त्या मागील काही दिवसापासून पोलिस मुख्यालयात नोकरी करत होत्या. त्यांचे तीन महिण्यापूर्वीच गणेश आणेराव यांच्यासोबत लग्न झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त होत आहे. 

लिंबगाव पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल

घटनेची माहिती लिंबगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरिक्षक विश्‍वांभर पल्लेवाड यांना मिळाली. पोलिस घटनास्थळी पोहचण्यापूर्वीच वाहन चालक आपले वाहन घेऊन पसार झाला. पोलिसांनी जखमींना विष्णुपूरी येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच श्रीमती लेंडाळे यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय सुत्रांनी सांगितले. या प्रकरणी गणेश आणेराव यांच्या फिर्यादीवरुन लिंबगाव पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार गणेश गोटके करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unfortunate incident: Female policeman killed in road accident nanded news