दूर्दैवी घटना : पती- पत्नीच्या पन्नास वर्षांचा प्रवास एकाच दिवशी संपला, परिसरात हळहळ 

प्रभाकर दहीभाते
Saturday, 7 November 2020

बरड शेवाळा (ता. हदगाव) येथील पती- पत्नी यांनी जगाचा अवघ्या चार तासांच्या अंतराने निरोप घेतला. एकाच चितेवर अंत्यसस्कार 

बरडशेवाळा (ता. हदगाव, जिल्हा नांदेड) : जन्मानंतर मुत्यू अटळ असते पण काही मुत्यू हे अनेकांना जिव्हारी लावून जातात. असाच एक प्रकार हदगाव तालुक्यातील बरड शेवाळा येथे शुक्रवारी (ता. सहा) नोव्हेंबर रोजी सकाळी सातच्या सुमारास घडला. पत्नीच्या मृत्यूनंतर अवघ्या चार तासाच्या आत पतीनेही आपला प्राण सोडला. या पती- पत्नीला एकाच चितेवर भडाग्नी दिला. 

पती- पत्नी या नात्याने पन्नास वर्षाच्या प्रवासात पत्नीच्या निधनाची माहिती कळताच व्याकुळ झालेल्या पतीने चार तासांच्या अंतरावर जगाचा निरोप घेतला. 
बरडशेवाळा (ता. हदगांव) येथील सदाशिव राऊत मुळ गाव कळमनुरी तालुक्यातील असुन इसापूर धरणांमध्ये गाव गेले. त्यामुळे आपले बिऱ्हाड घेऊन त्यांनी बरडशेवाळा हे गाव गाठले. येथेच त्यांची कर्मभूमी राहिली. तीन एकर कोरडवाहू शेती करत आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह चालवत असत. गरीबी त्यांच्या पाचवीला पुजलेली होती. ते आपली पत्नी अनूसयाबाई (वय ६५) हिच्यासोबत मिळेल ते काम करुन प्रपंच चालवित. यातच त्यांना एक मुलगी व एक मुलगा असे अपत्य झाले. मुलीला पुसद तालुक्यातील हिवळणी येथे दिले तर मुलगा, नातवंडे असा परिवार घेऊन पती- पत्नी दोघांनी मनमिळावू स्वभावाने बरडशेवाळा येथे दिवस काढले. 

हेही वाचानांदेड : पाणी प्लांट चालकांना महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे इंजेक्शन -

एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले

सध्या सदाशिव राऊत यांचे वय ७० वर्ष असून अनूसयाबाई यांचे ६५ वर्ष होते. अनूसयाबाई एक वर्षापासून अर्धांगवायु आजाराने त्रस्त होत्या. त्यांनी पोटाला पीळ देऊन अनेक वेळा रुग्णालयात उपचार घेतले. मात्र त्यांच्या प्रकृतीने साथ दिली नाही. अखेर अनूसयाबाई यांनी शुक्रवारी (ता. सहा) सकाळी सात वाजताच्या सुमारास जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अंत्यविधीची तयारी अंतीम टप्यात आली असता अवघ्या चार तासाच्या आताच पत्नी निधनाचा विरह सहन न झालेल्या सदाशीव राऊत यांनीही आपला प्राण सोडला. राऊत कुटुंबावर हा एकाच दिवशी दुहेरी आघात झाल्याने मयताच्या मुला- मुलीला नातेवाईकांनी धीर दिला. सायंकाळी बरडशेवाळा येथील स्मशनाभूमीत एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बरडशेवाळा परीसरातील अशा प्रकारची पहिलीच घटना असल्याने सर्वजन हळहळ व्यक्त करत होते.  

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unfortunate incident: Husband and wife's fifty year journey ended on the same day nanded news