दुर्दैवी घटना : सख्ख्या दोन चुलत भावांचा डोहात बुडून मृत्यू

गणेश ढेपे
Wednesday, 30 September 2020

कौडगाव येथील अल्पभूधारक शेतकरी गौतम गणपती जोंधळे यांचा मुलगा प्रवीण  (वय आठ वर्ष) व रोहिदास गणपती जोंधळे यांचा मुलगा शुभम (वय आठ वर्षे) हे दोघेही प्राथमिक शाळेत दुसऱ्या वर्गात शिकत होते.

मारतळा (जिल्हा नांदेड) : शाळेला सुट्ट्या आसल्याने घरच्या म्हशीना गावशेजारी असलेल्या एका डोहात धूत असतांना दोन चिमुकल्या सख्ख्या चुलत भावांचा या डोहातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना कौडगाव (ता. लोहा) येथे मंगळवारी (ता. २९) दुपारच्या सुमारास घडली. मृत्यूमुखी पडलेले दोन्ही चिमुकले इयत्ता दुसरीत शिक्षण घेत होते. मात्र एक जण डोहातून म्हशीच्या सिंगाला पकडून बाहेर आल्याने तो बचावला. 

कौडगाव येथील अल्पभूधारक शेतकरी गौतम गणपती जोंधळे यांचा मुलगा प्रवीण  (वय आठ वर्ष) व रोहिदास गणपती जोंधळे यांचा मुलगा शुभम (वय आठ वर्षे) हे दोघेही प्राथमिक शाळेत दुसऱ्या वर्गात शिकत होते. मात्र सध्या कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा बंद असल्याने हे दोघे सख्खे चुलत भाऊ म्हशी घेऊन चारायला शेतात गेले होते. त्यांच्यासोबत दहा वर्षाचा राहुल गौतम जोंधळे हा मोठा भाऊ होता. मात्र बाजूलाच असलेल्या पाण्याचा डोहात पाणी पिण्यासाठी म्हशी उतररल्या. 

हेही वाचानांदेड- नागपूर रस्ता बनला मृत्यूचा सापळा, खड्डे आणि महामार्ग पोलिसांचा जाच

जोंधळे कुटुंबियावर काळाचा घाला

प्रवीण, शुभम आणि राहुल हे तिघेही म्हशी धुण्यासाठी डोहात उतरले. मात्र त्यांना पाण्याचा अंदाज आला नसल्याने ते डोहात प्रविण आणि शुभम हे पाण्यात बुडत होते. दोघेही गटांगळ्या खात एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात बुडाले. तर राहुल मात्र म्हैशीच्या शिंगाला धरुन बाहेर आला. म्हणून तो बचावला. परंतु तो आपल्या सख्ख्या व चुलत भावंडांना वाचू शकला नाही.  त्याने बाहेर आल्यानंतर आरडा- ओरडा केला यावेळी शेतशिवारातील नागरिक धावत आले. स्थानिकांनी लगेच डोहात उडी घेऊन चिमुरड्यांना बाहेर काढून तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणत असतांना एकाचा रस्त्यातच तर दुसऱ्याचा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला.एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने जोंधळे कुटुंबीयांवर दुः खाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी उस्मानगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Unfortunate incident: Number of cousins ​​drowned in lake nande news