esakal | विदर्भ- मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील पूलाच्या कामाला लवकरच- खासदार हेमंत पाटील 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

हिमायतनगर तालुक्यातील चातारी गावाजवळ 30 कोटी रुपये खर्चुन हा पूल बांधण्यात येणार आहे.

विदर्भ- मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील पूलाच्या कामाला लवकरच- खासदार हेमंत पाटील 

sakal_logo
By
प्रकाश जैन

हिमायतनगर ( जिल्हा नांदेड )  : विदर्भ आणि मराठवाडा या दोन विभागांना जोडणाऱ्या पैनगंगा नदीवरील मोठ्या पुलाच्या कामाला लवकरच मंजूरी देण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी  खासदार हेमंत पाटील यांना दिले आहे. हिमायतनगर तालुक्यातील चातारी गावाजवळ 30 कोटी रुपये खर्चुन हा पूल बांधण्यात येणार आहे. या पूलामुळे दोन्ही विभागातील अनेक गावांना फायदा होणार आहे. मराठवाड्यातून विदर्भात जाण्यासाठीचे 25 कि. मी. चे अंतर या पुलामुळे कमी होणार आहे. 

हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी खासदार हेमंत पाटील यांच्याकडून केंद्र व राज्य सरकारकडे सतत पाठपुरावा सुरु असतो. गेल्या अनेक वर्षापासूनची पैनगंगा नदीवर नवीन पूल बांधण्याची मागणी प्रलंबीत होती. याबाबत खा. पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री यांची भेट घेवून सदरील पूलाच्या कामाला मंजूरी देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. त्यानूसार आगामी अर्थसंकल्पात या पूलाच्या कामासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्याचे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी खा. हेमंत पाटील यांना दिले.

विदर्भ आणि मराठवाड्याला जोडण्यासाठी सदरचा पूल महत्वाचा

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात यवतमाळ जिल्हा सीमा- दिघी- विरसणी- वाघी- जवळगांव- सोनारी फाटा- दुधड ते राज्य सिमा रस्त्यावरील चातारी गावाजवळ पैनगंगा नदीवर पोच मार्गासह हा मोठा पूल बांधण्यात येणार आहे. विरसणी ते वाघी- जवळगांव हा भाग राष्ट्रीय महामार्ग क्र. 752 झाला आहे. तसेच सोनारी फाटा येथे राष्ट्रीय महामार्ग क्र. 761 (अ ) झाला आहे. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याला जोडण्यासाठी सदरचा पूल महत्वाचा ठरणार आहे. या पूलामुळे वरील दोन्ही राष्ट्रीय महामार्ग देखील जोडले जाणार आहेत.

या पूलाचा दळणवळणासाठी फायदा होणार 

याशिवाय तेलंगणा राज्य जोडण्यासाठी सुध्दा पैनगंगा नदीवरील हा पूल उपयुक्त ठरणार आहे. हिमायतनगर व हदगांव तालुक्यातील अनेक गावांमधील लोकांना विदर्भात उमरखेड- महागांवकडे जाण्यासाठी 50 कि.मी. ऐवढ्या अंतरावरुन फेरा मारुन जावे लागते. परंतू चातारी गावाजवळ होणाऱ्या या पूलामुळे विदर्भ- मराठवाड्यातील लोकांना ये- जा करण्यासाठी 25 कि.मी. अंतर कमी होणार आहे. मराठवाड्यातील दिघी, पावनमारी, विरसणी, घारापूर, पिंपरी, कामारी, वाघी, टेंभूर्णी, जवळगांव, खडकी, हिमायतनगर अशा 25 गावांना तर विदर्भातील चातारी, बोरी, ब्राम्हणगांव, विडूळ, ढाणकी, कोपरा, देवसरी, खरजू, दिगडी, सावळेश्वर, तायलमनी या गावांना या पूलाचा दळणवळणासाठी फायदा होणार आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image