Video- नांदेड :महसूल भवन कर्मचारी निवासस्थानातील बाधीतांकडे दुर्लक्ष

शिवचरण वावळे
Friday, 7 August 2020

जिल्हाभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरासह काही तालुक्याच्या ठिकाणी देखील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शंभरावर पोहचली आहे. त्यामुळे यापूर्वी पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवण्यासाठीची सुविधा अपुरी पडत आहे.

नांदेड : शहरातील रुग्णालय हाऊसफुल झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांच्या आदेशाने नांदेड वाघाळा महापालिकेच्या आरोग्य विभागाने कोरोना बाधित रुग्ण ठेवण्यासाठी शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय व लातूर फाटा परिसरातील महसूल विभागाचे नवीन शासकीय निवसस्थानामध्ये बाधित रुग्णांना ठेवण्याची सुविधा केली आहे.  परंतू या रुग्णांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप येथील विलगीकरण कक्षातील काही बाधित रुग्णांनी केला आहे.   

जिल्हाभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शहरासह काही तालुक्याच्या ठिकाणी देखील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शंभरावर पोहचली आहे. त्यामुळे यापूर्वी पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवण्यासाठीची सुविधा अपुरी पडत आहे. सध्या विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय, श्री गुरु गोविंदसिंघ स्मारक जिल्हा रुग्णालय, पंजाब भवन कोविड केअर सेंटर या ठिकाणी बाधित रुग्णांसाठी विशेष कोविड केअर सेंटर सुरु आहे. परंतू तिन्ही ठिकाणी हाऊसफुल रुग्ण झाले आहेत. त्यामुळे शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय व महसूल भवन शासकीय निवासस्थान अशा दोन्ही ठिकाणी प्रत्येकी पन्नास बाधित रुग्ण ठेवण्यासाठी सुविधा करण्यात आली आहे. 

हेही वाचा- गणेशमूर्ती कारागिरांमध्ये अस्वस्थता वाढली...काय आहे कारण? वाचा... ​

व्हिटॅमिन-सीच्या गोळ्या नाहीत 

सध्या महसूल भवन शासकीय निवसस्थान येथे ४९ तर आयुर्वेदिक रुग्णालयात १९ रुग्ण विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत. दोन्ही ठिकाणी राहण्याची सुविधा उत्तम आहे. परंतु महसूल भवन निवासस्थानमध्ये ठेवण्यात आलेल्या रुग्णांना मागणी केल्यावरही व्हिटॅमिन-सी, आयुष काढा व इतर कुठल्याही गोळ्या औषधी दिल्या जात नाहीत, असा आरोप येथे असलेल्या काही बाधित रुग्णांनी केला आहे.   
 
हेही वाचा- गुरुवारी नांदेड जिल्ह्यात १६८ पॉझिटिव्ह रुग्ण वाढले ​

आयुष काढा का दिला जात नाही?

शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील पद्यव्युत्तर विभागाच्या विद्यार्थ्यांनी पंजाब भवन कोविड केअर सेंटर व जिल्हा रुग्णालय व शासकीय रुग्णालयातील बाधित रुग्णांसाठी प्रायोगिक तत्वावर आयुष काढ्याचे वाटप दररोज केले जात आहे.  त्यांच्या या उपक्रमाची आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी देखील दखल घेतली आहे. त्यानंतर आयुष काढा तयार करण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. यासाठी लागणारे आयुर्वेदिक मसाले, औषधी वनस्पती, प्लास्टीकचे कप व इतर साहित्यासाठी शासन खर्च करत असले तरी, हा आयुष काढा मर्यादित रुग्णांपर्यंतच पोहचत आहे. त्यामुळे इतर ठिकाणी ठेवलेल्या कोरोना बाधित रुग्णांना आयुष काढा का दिला जात नाही? असा प्रश्‍न रुग्ण उपस्थित करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Video- Nanded: Ignoring The Obstructions In The Revenue Building Staff Quarters Nanded News