esakal | बिलोली तहसीलमध्ये गाव तर मतदान धर्माबाद तालुक्यात; २५ वर्षापासून काराळचे भिजत घोंगडे 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

बिलोली तालुक्याचे विभाजन झाल्यानंतर धर्माबाद व नायगाव हे दोन तालुके अस्तित्वात आले.

बिलोली तहसीलमध्ये गाव तर मतदान धर्माबाद तालुक्यात; २५ वर्षापासून काराळचे भिजत घोंगडे 

sakal_logo
By
विठ्ठल चंदनकर

बिलोली (जिल्हा नांदेड ) : तालुक्याचे विभाजन होऊन पंचवीस वर्षाचा कालावधी संपला मात्र ग्रामपंचायतीचे विभाजन अद्याप न झाल्यामुळे बिलोली तालुक्यातील काराळ येथील जनतेला कामकाजासाठी बिलोली तालुक्यात तहसील व पंचायत समितीला यावे लागते. ग्रामपंचायतीचे मतदान मात्र धर्माबाद तालुक्यातील मोकली गट ग्रामपंचायतीला जोडलेले असल्याने ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवड झाली तरी येथील सदस्यांना गावातील समस्या मांडण्यासाठी कुठेच थारा मिळत नाही. याकडे जिल्हाधिकार्‍यांनी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी लक्ष वेधून काराळ वासियांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पुढे येत आहे.

बिलोली तालुक्याचे विभाजन झाल्यानंतर धर्माबाद व नायगाव हे दोन तालुके अस्तित्वात आले. धर्माबाद तालुक्यात गावांची संख्या कमी पडत असल्यामुळे गोदावरी नदीच्या काठावर असलेले पाटोदा थडी, माष्टी, शेळगाव, मोकली इळेगाव, बामणी मनूर आणि संगम ही आठ गावे बिलोली तालुक्यातून वगळून धर्माबाद तालुक्याला जोडली गेली. या आठ गावापैकी सात ठिकाणी स्वतंत्र ग्रामपंचायती असून मोकली व काराळ ही गटग्रामपंचायत आहे. या दोन गावांपैकी मोकली हे धर्माबाद तालुक्यात तर काराळ बिलोली तहसील कार्यालयात समाविष्ट करण्यात आले. 

बिलोली तालुक्याचे विभाजन होऊन पंचवीस वर्षाचा कालावधी संपला मात्र मोकली व काराळ या गट ग्रामपंचायतीचे विभाजन अद्याप न झाल्यामुळे या गावातील विकासासंबंधी नागरिकांनी दाद मागायची तरी कुणाकडे? असा प्रश्न ग्रामस्थांपुढे उभा टाकला आहेत. काही नागरिकांनी ग्रामपंचायत विभाजनाचा प्रश्न जिल्हाधिकारी व आयुक्त कार्यालयापर्यंत तसेच सर्वोच्च न्यायालयापर्यंत लावून धरला होता. २०१४ मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर या गट ग्रामपंचायतीचे विभाजन करण्याचे लेखी आश्वासनही देण्यात आले होते. या घटनेला सहा वर्षाचा कालावधी ही संपला परंतु ग्रामपंचायत विभाजनाचा मार्ग अद्याप मोकळा झाला नाही.

गेल्या दहा वर्षात नागरिकांनी केलेल्या पाठपुराव्याला काही प्रमाणात यश आले असून तीन वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोकली ग्रामस्थांनी धर्माबाद तालुक्यात तर काराळ ग्रामस्थांना तालुक्यातील आरळी जिल्हा परिषद गटात मतदान करण्याची संधी मिळाली होती. आता होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत ग्रामपंचायतीच्या विभाजनाअभावी काराळ येथील मतदारांना मोकली गट निवडणुकीसाठी धर्माबाद तालुक्यात मतदान करावे लागत आहे.

मागील पाच वर्षाच्या काळात काराळ हे गाव बिलोली तालुक्यातील हज्जापूर ग्रामपंचायतीला जोडण्यात आले होते. या दोन्ही गावातील लोकसंख्या एकत्र करुन केंद्र व राज्य शासनाकडून विकास निधी प्राप्त झाला. जल जीवन मिशन योजनेअंतर्गत १५ व्या वित्त आयोगातून पाच लाखाचे तर १४ व्या वित्त आयोगातून चार लाखाची कामे हज्जापूर ग्रामपंचायतीसाठी आलेल्या निधीतून काराळ गावात करण्यात आली.

बिनविरोध सदस्य होऊनही महत्त्व शून्य. प्रशासकीय पातळीवर या गट ग्रामपंचायतीचे विभाजन रखडले आहे. मोकली काराळ गट ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत काराळ येथील दोन जागांसाठी महेमुददा रोशनसाब सय्यद व रमेश मोहन श्रीगिरे यांना बिनविरोध निवडून देण्यात आले. ही निवड पुढील पाच वर्षासाठी आहे. बिनविरोध निवडून आलेल्या सदस्यांचे गाव  बिलोली तालुक्यात समाविष्ट असल्यामुळे या गावचा विकास निधी बिलोली पंचायत समितीला येतो. त्यामुळे बिनविरोध निवड झालेले दोन्ही सदस्य मोकली व काराळ या गट ग्रामपंचायतीचे असणार आहेत. या सदस्यांना बिलोली तालुक्यात गावातील समस्या मांडण्यासाठी व्यासपीठचं नाही. त्यामुळे त्यांची ही बिनविरोध निवड शून्य मानल्या जाणार आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image