महावितरणचा एक गाव- एक दिवस उपक्रम

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 5 August 2020

एकाच दिवशी अनेक समस्यांचे समाधान करत 115 गावांमध्ये, नवीन वीजजोडणीसह देखभाल दुरूस्तीची 3848 कामे पुर्ण .    

नांदेड : वीजयंत्रणेच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसह वीजबिल दुरुस्ती व नवीन वीजजोडणी या समस्यांचे निराकरण करत विविध प्रश्न मार्गी लावणाऱ्या महावितरणच्या नांदेड परिमंडळाने एक गाव-एक दिवस हा विशेष उपक्रम हाती घेत गेल्या दोन ते तीनमहिन्यात नांदेड, हिंगोली व परभणी जिल्हयातील 115 गावांमध्ये वीजयंत्रणेची विविध प्रकारची 3848 कामे पुर्ण केली आहेत. नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री डी.व्ही.पडळकर यांच्या संकल्पनेतून नांदेड परिमंडळात एक गाव-एक दिवस हा विशेष उपक्रम राबविण्यास सुरवात करण्यात आली.

यामध्ये रोहित्रातील तेलाची पातळी वाढविणे, तारांमधील झोल काढणे, स्पेसर्स बसविणे, वीजपुरवठ्याला अडथळे ठरणाऱ्या झाडाच्या फांद्या तोडणे, पीन व डिस्क इन्सूलेटर बदलणे, वितरण रोहित्रांना अर्थिंग करणे, डिस्ट्रीब्यूशन बॉक्सचे क्लिनिंग व आवश्यक दुरुस्ती, किटकॅट बदलणे, सडलेले वीजखांब बदलणे, वाकलेले वीजखांब सरळ करणे, नादुरुस्त व धोकादायक सर्व्हिस वायर्स बदलणे आदी कामांचा समावेश आहे. याशिवाय सदोष व नादुरुस्त वीजमीटर बदलणे, वीजबिलांची दुरुस्ती, वीजमीटरची तपासणी, नावात बदल करणे अशा प्रकारची कामे या उपक्रमांतर्गत करण्यात आली आहेत.

हेही वाचा -  Video - ॲन्टीजेन तपासणीस नांदेडमध्ये प्रतिसाद

नांदेड जिल्हयातील 91 गावांमघ्ये देखभाल दुरूस्तीची 2263 कामे

वीजसुरक्षा व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी परिणामकारक ठरलेल्या एक गाव एक दिवस या उपक्रमांतर्गत नांदेड जिल्हयातील 91 गावांमघ्ये देखभाल दुरूस्तीची 2263 कामे पुर्ण करण्यात आली असून या उपक्रमांतर्गत 133 वीजग्राहकांना तत्काळ नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे. तसेच हिंगोली जिल्हयातील सात गावांमध्ये विविध प्रकारची 619 कामे पुर्ण करण्यात आली आहेत तर 27 वीजग्राहकांना तत्काळ नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे. परभणी जिल्हयातील 17 गावामध्ये 966 कामे पुर्ण करण्यात आली असून सहा वीजग्राहकांना नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या गावांमध्ये एक गाव एक दिवस उपक्रम

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सर्वत्र असल्यामुळे संक्रमण होणार नाही याची काळजी घेत प्रादुर्भाव नसलेल्या गावांमध्ये एक गाव एक दिवस उपक्रम यशश्वीरित्या राबवत विजेच्र्या समस्या दिवसभरातच मार्गी लागल्यामुळे वीजग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे. हा उपक्रम यशश्वी करण्यासाठी मुख्य अभियंता डी.व्ही.पडळकर  यांच्या निर्देशानुसार नांदेड मंडळाचे अधीक्षक अभियंता श्री. संतोष वहाणे, हिंगोली मंडळाचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव तसेच परभणी मंडळाचे अधीक्षक अभियंता  प्रविण अन्नछत्रे त्याचबरेाबर सर्व विभागांचे  कार्यकारी अभियंता व त्यांच्या सहकाऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होत परिश्रम घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A village of MSEDCL- One day activity nanded news