केळी बागायतदारांनो सावधान ! विषाणू रोग आणि फुलकिडीचे होतेय आक्रमण

Nanded News
Nanded News

नांदेड : सोयाबीन, कपाशीपाठोपाठच किळीच्या बागांवरही सध्या विषाणू रोग आणि फुलकिडीचे आक्रमण मोठ्या प्रमाणावर होत आहे. असे असलेतरी शेतकऱ्यांनी घाबरून न जाता योग्य व्यवस्थापन केलेतर यावरही मात करता येवू शकते, असे कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डाॅ. देविकांत देशमुख यांनी सांगितले आहे.

सध्या केळी लागवड क्षेत्रामध्ये ककुंबर मोझॅक व्हायरस (इन्फेकशियस क्‍लोरोसिस) प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसत आहे. हरितद्रव्य लोप पावणे हे या रोगाचे प्रमुख लक्षण असून, पानांच्या शिरातील हरितद्रव्य नष्ट झाल्याने शिरातील उतींचा ऱ्हास होऊन त्या मृत पावतात. उतींचा ऱ्हास झाल्याने पानांवर पिवळसर सोनेरी रेषा किंवा अनियमित चट्टे दिसून येतात. पोंगा व पोंग्याजवळचे पान कुजते. झाडाची वाढ खुंटून कालांतराने झाड मरते. या रोगाचा प्राथमिक प्रसार कंदामार्फत तर दुय्यम प्रसार मावा किडीमार्फत होतो. 

काय होतात परिणाम
किडीची मादी खोड, पाने व फण्यांच्या बेचक्यात अंडी घालते. किडीची प्रौढ व बाल्यावस्था अपरिपक्व फळांची साल खरवडते व त्यातील अन्नरसाचे शोषण करते. कीडग्रस्त फळांच्या सालीवरील पेशी मरतात. त्यामुळे फळांवर तांबूस तपकिरी किंवा लालसर रंगाचे चट्टे तयार होऊन फळे लालसर रंगाची दिसतात. कीडग्रस्त फळे पक्व झाल्यानंतर, मृत पेशींमुळे सालीवर तडे पडतात. त्यामुळे बाजारपेठेत केळीची प्रतवारी खालावते.


 
घडांचे नियमित निरीक्षण करावे
घडांचे नियमित निरीक्षण करावे. बागेत सूर्यप्रकाश व हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी. बाग तणविरहित व स्वच्छ ठेवावी. झाडांचे कापलेले अवशेष बाहेर काढून नष्ट करावेत. संपूर्ण फण्या निसवल्यानंतर केळफूल तोडून नष्ट करावे. केळफुल बाहेर पडल्यानंतर, अॅसिटामिप्रिड (२० एसपी) ०.१२५ ग्रॅम किंवा डायमिथोएट (३० इसी) दोन मि.लि. किंवा व्हर्टिसीलीयम लेकॅनी तीन ग्रॅम किंवा अॅझाडिरेक्टिन (१५०० पीपीएम) पाच मि.लि. अधिक स्टिकर एक मि.लि. प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फण्यांची विरळणी करावी
घडातील फळांच्या आकारात एकसमान बदल होऊन घड लवकर परिपक्व होण्यासाठी फण्यांची विरळणी करावी. केळीला सरासरी १० ते १२ पेक्षा जास्त फण्या येतात. विरळणी न केल्यामुळे सर्व फण्यांना योग्य पोषण मिळत नाही तसेच फळांचे आकारमान एकसमान राहत नाही. परिणामी फळांचा दर्जा कमी होतो. दर्जेदार उत्पादनासाठी घडावर आठ ते १० फण्या ठेवून अतिरिक्त फण्यांची विरळणी करावी. घडात राखावयाच्या फण्या ठरवून त्या लगतच्या खालच्या फणीत एक केळी ठेवून उर्वरित खालील फण्या कापून टाकाव्यात. 

द्रावणांची एकत्रित फवारणी करावी
घड निसवणी पूर्ण झाल्यावर अन्नद्रव्यांचा योग्य पुरवठा होऊन फळांच्या आकारात सकारात्मक बदल होतो. घडाच्या फण्यात आलेली वेडीवाकडी केळीफळे, जोड फळे चाकूच्या सहाय्याने कापावीत. घड पूर्ण निसवल्यानंतर व विरळणीनंतर घडावर पोटॅशियम डाय हायड्रोजन फॉस्फेट ५ ग्रॅम अधिक युरिया १० ग्रॅम प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावणाची एकत्रित फवारणी करावी. फवारणीमुळे फळांची लांबी आणि घेर वाढून वजनात वाढ होते. तसेच घड लवकर कापणीस तयार होतो.

असे करा व्यवस्थापन

  • विषाणू रोगांचा प्राथमिक प्रसार प्रामुख्याने कंदामार्फत होत असल्याने लागवडीसाठी निरोगी बागेतील कंद निवडावेत. 

  • उतिसंवर्धित रोपांपासून लागवड करताना नोंदणीकृत उतिसंवर्धन प्रयोगशाळेतून विषाणू निर्देशांक तपासलेली, निरोगी व जोमदार रोपे खरेदी करावीत.

  • रोपनिर्मितीसाठी स्वतंत्र मातृबाग असणे आवश्‍यक आहे. 

  • रोगाची लक्षणे दिसताच रोगट झाडे कंदासकट उपटून नष्ट करावी. 

  • मावा किडीच्या नियंत्रणासाठी, डायमिथोएट (३० ईसी) २ मिलि किंवा थायमेथोक्झाम (२५ डब्ल्यूजी) ०.२ ग्रॅम किंवा इमिडाक्लोप्रीड (१७.८ एसएल) ०.५ मिलि प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 

  • केळी बाग आणि बांध नेहमी स्वच्छ ठेवावेत. 

  • केळी पिकात काकडीवर्गीय, टोमॅटोवर्गीय पिके आंतरपीक म्हणून किंवा केळी बागेच्या परिसरात घेऊ नये. 

  • परप्रांतातून केळीचे कंद किंवा रोपे आणू नयेत, यासाठी संसर्गरोग उपायांची कडक अंमलबजावणी करणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com