‘विष्णुपुरी’तून आतापर्यंत तीन हजार चारशे दलघमी विसर्ग 

प्रमोद चौधरी
Sunday, 4 October 2020

विष्णुपुरी प्रकल्पातून तब्बल तीन हजार ४१२ दशलक्ष घनमीटर पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले. हे पाणी प्रकल्प क्षमतेच्या चाळीस पट असल्याचे माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून मिळाली. 

नांदेड : नांदेड शहराजवळील विष्णुपुरीच्या डॉ. शंकरराव चव्हाण जलाशयात जायकवाडी, माजलगाव, निम्न दुधना, येलदरी प्रकल्पासह पावसाचे पाणी आल्यामुळे प्रकल्पातून तब्बल तीन हजार ४१२ दशलक्ष घनमीटर पाणी गोदावरी नदीत सोडण्यात आले. हे पाणी प्रकल्प क्षमतेच्या चाळीस पट असल्याचे माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून मिळाली. 

गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात यंदा पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. यामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणापासून ते बाभळी बंधाऱ्यापर्यंतचे (नांदेड) प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ झाले आहेत. यंदा जूनपासूनच पावसाचे प्रमाण चांगले होते. यामुळे ७९ दलघमी साठा असलेला विष्णुपुरी प्रकल्प जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शंभर टक्के क्षमतेने भरला. परिणामी प्रकल्पातून गोदावरी नदीपात्रात अतिरिक्त पाणी सोडावे लागले. यानंतर अतिवृष्टी झाल्यामुळे प्रकल्पात सतत येणारा येवा लक्षात घेऊन वेळोवेळी बंधाऱ्याचे दरवाजे उघडून विसर्ग करण्यात आला. 

हेही वाचा - पालकांनो सावधान ! आपली मुले गॅझेटच्या दुनियेत रमलीतर नाही ना?

दरम्यान ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पावसाचे प्रमाण अचानक वाढल्यामुळे ऊर्ध्व बाजूचे सर्व बंधारे व धरणे शंभर टक्के भरले. यानंतरही पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात चालू झाला. जायकवाडी, माजलगाव, येलदरी, सिद्धेश्वर, निम्न दुधना व इतर सर्व धरणातून एकदाच साधारणतः दोन लाख क्सुसेक्स एवढा प्रचंड विसर्ग चालू होता. हा येवा विष्णुपुरी प्रकल्पात साठवून सतत स्वरूपात खालच्या बाजूला सोडण्याचे आव्हानात्मक काम नांदेड पाटबंधारे विभागासमोर होते. 

हेही वाचाच - नांदेड - जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे तिनतेरा, तरीही श्रेयवादाचे राजकारण संपेना

परंतु जिल्हाधिकारी डॉ. विपीन, नांदेड पाटबंधारे मंडळाचे अधीक्षक अभियंता एक. के. सब्बीनवार, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, नांदेड पाटबंधारे विभागाचे (उत्तर) कार्यकारी अभियंता निळकंठ गव्हाणे, प्रकल्पाचे कनिष्ठ अभियंता एस. के. काळगेस्वामी यांच्यासह पोलिस प्रशासन, अग्निशामन दल, आपत्ती व्यवस्थापन पदाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने येवा सुरळीत नियंत्रित करुन विसर्ग करण्याचे काम झाले. विष्णुपुरीतून ता. एक जून ते ता. ३० सप्टेंबर या कालावधीत साधारणतः तीन हजार ४१२ दशलक्ष घनमिटर विसर्ग करण्यात आला. हा विसर्ग विष्णुपुरी प्रकल्प क्षमतेच्या ४२ पट असल्याचे सुत्रांनी सांगीतले. 

येथे क्लिक कराच - जिंतूरमध्ये पाण्याच्या प्रतिक्षेत नागरिक आतूर; पन्नास वर्षात तीन योजना, तरीही प्रश्‍न कायम
  

विष्णुपुरीच्या वरील धरणातून एकदाचवेळी साधारणतः दोन लाख क्सुसेक्स एवढा प्रचंड विसर्ग चालू होता. हा येवा विष्णुपुरी प्रकल्पात साठवून सतत स्वरूपात खालच्या बाजूला सोडण्याचे आव्हानात्मक काम नांदेड पाटबंधारे विभागासमोर होते. जिल्हा प्रशासनाच्या मदतीने हे काम यशस्वी केले. 
- एस. के. सब्बीनवार, अधीक्षक अभियंता, नांदेड पाटबंधारे मंडळ, नांदेड. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Vishnupuri Project Overflowed Nanded News