नांदेडच्या भोलेश्वर पर्वतावर वड आणि पिंपळांची लागवड

सकाळ वृत्तसेवा
Monday, 6 July 2020

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्ष लागवड करण्यात आली. गुंडेगाव (ता. नांदेड) येथील सरपंच दासराव हंबर्डे यांच्या संकल्पनेतून वड आणि पिंपळाचे शेकडो वृक्ष लावून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली.

नांदेड : शहरापासून काही अंतरावर आणि स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या मागे असलेल्या गुंडेगाव परिसरातील भोलेश्वर मल्लिनाथ देवस्थान या निसर्गरम्य परिसरात गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्ष लागवड करण्यात आली. गुंडेगाव (ता. नांदेड) येथील सरपंच दासराव हंबर्डे यांच्या संकल्पनेतून वड आणि पिंपळाचे शेकडो वृक्ष लावून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. यापूर्वीही त्यांनी या पर्वतावर जवळपास एक लाख कडुनिंबाचे वृक्ष लागवड केली आहे.

नांदेड तालुक्यातील गुंडेगाव शिवारामध्ये श्री भोलेश्वर मल्लिनाथ देवस्थान आहे. या देवस्थान परिसरामध्ये वृक्ष लागवड करून शासनाच्या वृक्ष लागवड योजनेलाही गावकरी व मल्लिनाथ महाराज यांच्या भक्तांनी हातभार लावला आहे. रविवारी (ता. पाच) गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या पर्वतावर जवळपास एक हजार वडाचे व पिंपळाचे झाड लावून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. सद्गुरु श्री श्री श्री मल्लिनाथ महाराज यांच्या भिगवन तालुका दौंड येथे दरवर्षी देशातील लाखो भाविक भक्त गुरुपौर्णिमा साजरी करण्यासाठी येत असतात.

हेही वाचा -  तराफे विरुद्ध बोटी सामना रंगणार... काय आहे प्रकार वाचा...?

कोरोनामुळे गुरु पौर्णिमेचा उत्सव रद्द

परंतु यावर्षी कोरोनामुळे गुरु पौर्णिमेचा उत्सव रद्द करण्यात आला. बाबांनी आपल्या सर्व भक्तांना निसर्ग हाच देव आहे. निसर्गाचे संवर्धन व रक्षण करा. निसर्गाने तयार केलेल्या पंचमहाभूत शरीरामध्ये वास करणारा आत्मा, परमात्म्याचे हृदय मंदिरामध्ये ध्यान करून आपले श्रद्धास्थानमध्ये राहणाऱ्या गुरूला आपल्या घरामध्ये, मनामध्ये, आपण जिथे आहात तिथेच गुरुपौर्णिमा साजरी करावी असे आवाहन करण्यात आले होते.

मंदीर बांधण्यापेक्षा जनतेचे मन बांधा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन असल्याने निसर्ग आणि सरकारचे नियम जनतेनी व भक्तांनी पाळावे व देश पूजा करायला पाहिजे. घर बांधणे किंवा मंदीर बांधण्यापेक्षा जनतेचे मन बांधणे, देश बांधणे हे सर्वात श्रेष्ठ कार्य आहे. निसर्गाचे रक्षण वृक्ष लागवड करून करावे. त्यांच्या या संदेशाचे पालन म्हणून श्री भोलेश्वर मल्लिनाथ देवस्थान सरकारमान्य तिर्थक्षेत्र व पर्यटनस्थळ एक हजार वड व पिंपळाच्या वृक्षाची लागवड केली. कारण हे दोन्ही वृक्ष २४ तास ऑक्सीजन देणारे वृक्ष म्हणून ओळखल्या जातात.

येथे क्लिक करा -  Video - सिडकोतील नागरिकांच्या मरणयातना संपेनात, काय आहे कारण?

पंजाब सरकारकडून कौतुक

सरपंच दासराव हंबर्डे यांच्या पुढाकारातून ही गुरुपौर्णिमा वृक्षलागवड करून साजरी करण्यात आली. एक लाख कडूनिंब झाडे लावून त्याची जोपासना केल्याबद्दल पंजाब सरकारचे ग्रामविकास मंत्री सरदार मालूकासिंग यांनी दोन लाख रुपये बक्षीसही यापूर्वी दिलेले आहे. यावेळी रामराव हंबर्डे, कांता पाटील, आनंदराव मस्के, ॲड. संतोष इंगळे यांच्यासह गुंडेगावकर आणि भक्तमंडळी उपस्थिती होती.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wad and Pimpal cultivation on Bholeshwar hill in Nanded