Video - इतिहासात पहिल्यांदाच घरी घेतला वारीचा आनंद, कसा? ते वाचाच

प्रमोद चौधरी
गुरुवार, 2 जुलै 2020

कोरोनाच्या महामारीमुळे वारी यंदा इतिहासात पहिल्यांदाच झाली नाही. त्यामुळे वारकऱ्यांनी बुधवारी (ता.एक जुलै) रोजी आषाढी एकादशीच्यानिमित्ताने आपापल्या घरीच भजन-गायनातून वारीचा आनंद घेतला.

नांदेड : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आणलेली आहे. प्रमुख मंदिरेही दर्शनासाठी बंद आहेत. त्यामुळे यंदा वारीला देखील परवानगी दिली नसल्याने पंढरपूरनगरी इतिहासात पहिल्यांदाच सुनीसुनी बघायला मिळाली.

आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी आळंदीसह पैठण, नर्सी नामदेव, शेगाव आदी ठिकाणांहून दिंड्या पंढरपुरला जातात. या सोहळ्यामध्ये देशभरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. यंदा मात्र कोरोनाचे संकट असल्याने वारीला भाविक मुकले. असे असले तरी भाविकांनी जमेल तसे, आपापल्या घरीच भजन-गायनाच्या माध्यमातून वारीचा आनंद घेत आषाढीचा उत्सव अखंडित सुरु ठेवला.

ज्ञानाची मूर्ती म्हणजेच विठोबा. पांडुरंगाकडे कोणतीही सक्ती नसते. वारी करावीच, दान द्यावेच, अशी कोणतीही अट नसते. पांडुरंगाने दिले ते फक्त विचार. याच पांडुरंगाच्या भक्तांनीही समाजप्रबोधनाचा विडा उचलत समाजाला योग्य दिशा दाखवली. हेच कार्य आज वारकरी संप्रदाय अखंडित करत आला आहे. 

हेही वाचा - शिक्षणसंस्था चालकांवर शाळा सुरु करण्याचा पेच, कसा?
 

दरवर्षी आषाढी यात्रेसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून विविध संतांच्या पालख्यांसह लाखो भाविक पंढरपुरला जात असतात. मजल-दरमजल करत आषाढी दशमीला या सर्व पालख्या पंढरपुरात पोचतात. नांदेड जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणावर पालख्या पंढरपूरला जातात. यंदा मात्र कोरोनाच्या संकटामुळे या पालख्या पंढरपूरला गेल्या नसल्या तरी, अनेकांनी घरीच वारीचा आनंद घेतला आहे.

शहरातील मंदिरांतही शुकशुकाट
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरसह इतरही ठिकाणच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये भाविकांचे दर्शनासाठी गर्दी होत असते. शहरातील दत्तनगर, नवीन कौठा, नृसिंह मंदिर, विवेकनगर, समर्थनगर आदी शहराच्या विविध भागांतील मंदिरांमध्ये पूजेशिवाय इतर कुठलेही धार्मिक कार्यक्रम झाले नाहीत. मालेगाव रोडवरील पासदगाव येथे ज्ञानेश्‍वर माऊली आश्रमामध्येही पहिल्यांदाच शुकशुकाट जाणवला. येथे पंचक्रोशीतील पायी दिंड्या मोठ्या प्रमाणावर येत असतात.

हे देखील वाचाच - नांदेड जिल्हा परिषदेत आगळा वेगळा कृषीदिन साजरा 

बच्चे कंपनींचाही हिरमोड
कोरोनाने संपूर्ण जगच व्यापून टाकले असल्याने त्याचा परिणाम समाजघटकांवरही पडला आहे. आषाढीनिमित्त बालवाड्या, शाळा-शाळांतून बाल वारकरी दिंड्या काढून वारीचा अनुभव घेत असतात. परंतु, यंदा पहिल्यांदाच वारीचा आनंद लुटता आला नसल्यामुळे बच्चे कंपनीही हिरमुसलेली दिसून आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wari Enjoyed Taking Home For The First Time In History Nanded News