
अर्धापुरात पाणीटंचाईची चाहूल; पाणीपुरवठा योजनेची नागरिकांना हूल
अर्धापूर : शहरातील विविध भागात पाणी टंचाईची चाहूल लागली असून पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. तर दुसरीकडे पाणी पुरवठा योजना अंतिम टप्प्यात आली असली तरी अद्याप कार्यान्वित झाली नसल्याने ही योजना नागरिकांना हूल देत आहे. काम करण्याचा अवधी संपला असताना काम कासव गतीने सुरू आहे. सत्ताधारी नगरसेवक व प्रशासन पाणी पुरवठा करण्यासाठी तारिख पे तारीख देत आहेत.
पाणी पुरवठा करता करता दोन उन्हाळे निघून गेले आहेत पण नागरिकांना पाणी काही मिळत नाही. अर्धापूर शहरातील दुर्गानगर, फुलेनगर, बसस्थानक परिसरात, नवी आबादी भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागणार आहे. स्थानिक नगरसेवकाला पाणी टंचाई दूर करुन टॅंकरने पाणी पुरवठा मागणी केली तर काही दिवसातच नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे असे सांगण्यात येत आहे. पाणी पुरवठा योजनेचे पाणी मिळेल तेव्हा मिळेल पण सध्या आमचा जीव जातोय, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त केल्या जात आहेत.
शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी सुमारे २८ कोटी खर्चून पाणी पुरवठा योजना तयार करण्यात येत आहे. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शहरातील विविध भागात जल वाहिनी टाकने, जलकुंभ बांधकाम, मुख्य जलवाहिनी, जलशुध्दीकरण केंद्र आदी कामे पूर्ण झाली आहेत. पाणी पुरवठा लवकरच होणार आहे असे गेल्या कित्येक महिन्यांपासून सांगण्यात येत आहे.
नुकत्याच झालेल्या नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत शहरातील पाणी टंचाईच्या मुद्यांववर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शहरातील नागरिकांना लवकरच पाणी पुरवठा योजनेचा लाभ देण्यात येईल असे आश्वासन दिले होते. निवडणूक होवून दोन महिने झाले आहेत, उन्हाची तीव्रता वाढत आहे, जलस्रोत आटत आहेत. पण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली जात नाही या मुळे आम्ही कोणावर विश्वास ठेवावा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
''पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी शहरातील पाणी टंचाई दुर करण्यासाठी महत्वाकांक्षी पाणी पुरवठा योजना तयार करुन मंजूर करून घेतली आहे. या योजनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. काही किरकोळ कामे बाकी आहेत. ही कामे लवकरच पूर्ण होणार असून नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा करण्यात येईल. शहरातील संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन नगरपंचायत प्रशासन उपाय योजना करित आहे.''
- छत्रपती कानोडे, नगराध्यक्ष.
Web Title: Water Scarcity In Ardhapur Citizens Of Water Supply Scheme
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..