पाण्यासाठी अबालवृद्धांची पायपीट सुरूच

नियोजनाअभावी टंचाई आराखडा कागदावरच; लेंडी नदीला आले गटाराचे स्वरूप
water problem
water problemsakal

देगलूर : या वर्षीचे पर्जन्यमान लक्षात घेता सध्या तरी शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात उन्हाळ्यात पुरेल एवढा मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. मात्र काही ठिकाणी नियोजनाअभावी नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करण्याची वेळ येत आहे. प्रशासनाने पाठवलेला टंचाई कृती आराखडा मंजूर झाला असला तरी तो अद्यापही कागदावरच आहे. तालुक्याला वरदान ठरलेले लेंडी नदीचे पात्र अवैध वाळू उत्खननामुळे कोरडेठाक पडले आहे. शहराजवळील नदीपात्रात शहरातील गटाराचे पाणी साचल्याने पात्राला गटार गंगेचे स्वरूप आले असून यावर अद्याप तरी प्रशासनाने ठोस काही केल्याचे दिसून येत नाही.

शहरातील काही भागात कमी दाबाने तर गेल्या महिन्याभरापासून भक्तापुर रोडवरील सद्गुगुरूनगर वसाहतीत गटाराचे पाणी नळाला येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालिका प्रशासन यावर काहीही कारवाई करत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील टंचाईचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने दोन कोटी रुपयांचा कृती आराखडा भूजल सर्वेक्षण यंत्रणेची मान्यता घेऊन मंजुरीसाठी पाठवला तो मंजूरही झाला. मात्र अद्याप तरी त्याची अंमलबजावणी केव्हा होईल याची शाश्वती कोणीही देत नाही. मात्र दरवर्षी प्रमाणे यावर्षीही कागदी खेळ मात्र सुरूच आहे. नदी उशाला असूनही गावकऱ्यांना एका हंडाभर पाण्यासाठी रात्र-रात्र जागून काढावी लागत आहे.

नळ योजना विशेष दुरुस्ती

संभाव्य टंचाईचा सामना करण्यासाठी १३ गावातील ८० लाख रूपये खर्चाच्या विशेष नळयोजना दुरुस्तीच्या कामांना मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये तुंबरपल्ली, वझर, माळेगाव, बोरगाव, मलकापूर, कुशावाडी, पिंपळगाव, खानापूर, तडखेल तांडा, सुंडगी, वन्नाळी शहापूर कुरुडगी मेदनकलुर (पुनर्वसन) या गावातील नळयोजनांचा समावेश आहे. खरेतर या गावातील पूर्वी झालेल्या योजनांच्या कामाची चौकशी करण्याची गरज आहे. पूरक नळ योजनेत तीन गावे समाविष्ट असून यामध्ये अंतापुर पाच लाख, देगाव पाच लाख तर तुंबरपल्ली येथे दहा लाखाच्या खर्चाच्या कामांचा समावेश आहे.

गरज पडल्यास टँकरसाठी तरतूद

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मे महिन्यात जाणवणाऱ्या भीषण पाणीटंचाई चा मुकाबला करण्यासाठी लोणी तांडा तुंबरपल्ली, आश्रम तांडा, पुंजरवाडी, गोगलातांडा, रामला तांडा या गावात चार लाख रुपये खर्च अपेक्षित धरून विहीर अधिग्रहणाचे प्रस्तावास मान्यता देण्यात आली असून प्रशासनाने त्याचे नियोजन केले आहे. तर गरज पडल्यास गोगला तांडा येथे टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आलीच तर प्रशासनाने तीन लाख रुपये खर्चाचे नियोजन न करून ठेवले आहे.

करडखेड प्रकल्पात ७५ टक्के पाणीसाठा

शहरासह तालुक्यातील काही गावांची तहान भागवणारा करडखेड मध्यम प्रकल्पात सध्या ७५ टक्के पाणी साठा उपलब्ध आहे. शहरात सध्या तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असून नागरिकांची एक दिवसाआड पाणी सोडावे अशी मागणी आहे. करडखेड ते देगलूरला येणाऱ्या पाइपलाइन मध्ये मोठ्या प्रमाणात गळती असल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. ती गळती बंद करण्याचे नियोजन पालिका प्रशासनाने हाती घेण्याची सध्या नितांत गरज आहे. करडखेड प्रकल्पातून उन्हाळी हंगामासाठी शेतीलाही पाणी दिले जात असले तरी नियोजन करून पाणी पुरवठा सोडला तर ऑक्टोंबर पर्यंत पाणी पुरेल एवढा साठा उपलब्ध राहू शकतो असे पाटबंधारे खात्यातील सूत्रांचे म्हणणे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com