कधी थांबणार : नांदेड जिल्ह्यात दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या

प्रल्हाद कांबळे
Monday, 24 August 2020

यातील एकाने गळफास घेऊन तर दुसऱ्याने विष प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी हिमायतनगर आणि अर्धापूर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २४) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नांदेड : सततची नापिकी आणि बँकेचे कर्ज या दुहेरी संकटात सापडलेल्या दोन कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यातील एकाने गळफास घेऊन तर दुसऱ्याने विष प्राशन करुन आपली जीवनयात्रा संपविली. या प्रकरणी हिमायतनगर आणि अर्धापूर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २४) आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अर्धापूर तालुक्यातील एकदरा येथील शेतकरी खुशाल कोंडिबा आरसुळे (वय ३२) यांच्या शेतावर मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. कधी अतिवृष्टी तर कधी अवर्षनाच्या कचाट्यात सापडेला हा शेतकरी लहरी निसर्गाच्या तावडीतून काही सुटला नाही. शेतातील उत्पन्न आपोआप घटले. त्यामुळे त्याला आपला प्रपंच चालविण्यासाठी बँकेचे कर्ज काढावे लागले. यावर्षी तरी शेती आपणास साथ देईल म्हणून पुन्हा त्याने आपल्या शेतात कर्ज काढून पेरणी केली. मात्र अति पावसाने शेतीतील पीक वाळून गेली. 

हेही वाचा -  नांदेड जिल्हा गुन्हेगारीमुक्त करणार, प्लॅन तयार- एसपी विजयकुमार मगर

एकदरा (ता. अर्धापूर) येथील घटना

शेवटी त्याने या दुहेरी संकटापुढे हतबल झाला आणि आत्महत्या करण्याचा धाडशी निर्णय घेतला. आपल्या कुटुंबातील सर्वांशी चांगले बोलून जड अंतकरणाने तो ता. २२ आॅगस्ट रोजी आपल्या शेतात गेला. सायंकाळच्या सुमारास त्याने झोक्यासाठी बांधलेल्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. २३) सकाळी उघडकीस आली. गजानन केरबा आरसुळे (वय २५) याच्या माहितीवरुन अर्धापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक साईनाथ सुरवसे करत आहेत. 

हिमायतनगर येतील घटना

तर दुसऱ्या घटनेत हिमायतनगर येथील शंकर पोतन्ना तुंगेवाड (वय ६२) यांच्याही शेतावर मागील काही वर्षापासून सतत नापिकी होत होती. तसेच त्याचे शासनाच्या कर्जमाफी योजनेच्या यादीत नाव आले नसल्याने तो बेचैन होता. त्याच्या बँकेचे कर्ज वाढतच गेले. हाताला काम नाही व शेतात उत्पन्न नाही या दुहेरी संकटात सापडल्याने अखेर रविवारी (ता. २३) रात्री विष पीऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. २४) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी हिमायतनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: When to stop: Debt-ridden farmers commit suicide in Nanded district nanded news