Video - मामाचं गाव कशामुळे हरवलंय? ते, तुम्ही वाचाच

प्रमोद चौधरी
Tuesday, 2 June 2020

लाॅकडाउनच्या पार्श्वभूमीवर ‘मामाचा गाव हरवलं’ या विषयावर चिंतन करायला लागलो तर प्रत्येकालाच बालपण आठवल्याशिवाय राहणार नाही. परंतु, अलिकडे मामाच शहरात राहण्यासाठी आल्यामुळे बच्चे कंपनींचे मामाचे गाव हरविल्याचे दुःख होत आहे.  

नांदेड : बालपणातील आठवणी या सुखद असतात. आनंददायी असतात. आजी-आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी, त्यांच्या मांडीवर झोपून आभाळाकडे पाहात तारे,  चंद्राचे निरीक्षण करत रम्य गावच्या गोष्टी लोककथा ऐकण्यामध्ये जो आनंद असतो त्यातून माणसाचं भरण पोषण होतं. मात्र, त्याला आजची पिढी मुकली आहे.

उन्हाळा म्हटला की बच्चे कंपनीसाठी आनंदाचा विषय असतो. शाळेला सुट्या, अभ्यासाची कटकट नाही, मनसोक्त खेळणे त्याचबरोबर सुटी घालवायला मामाच्या गावाला जाण्याची क्रेझ आजही टिकून आहे. परंतु, यावर्षी असलेल्या लाॅकडाउनमुळे मामाचे गाव दूरच ः शिवाय उन्हाळ्याच्या सुट्यासुद्धा हिरावल्या आहेत. ‘‘झुकझुक झुकझुक अगिनगाडी, धुराच्या रेषा हवेत काही, पळती झाडे पाहू या मामाच्या गावाला जावू या’’, असे बालगीत उन्हाळ्याच्या दिवसांत नेहमी ऐकायला यायचे. मात्र, यंदा कोरोनाने वाटच अडविल्याने मामाच्या गावाला जाण्यास सक्तीने सुटी मिळाली आहे. कोरोनाच्या महासंकटाने जगभरातील विविध क्षेत्रांसह वयोगटांना आपल्या मगरमिठीत घेतले आहे.

उन्हाळ्याच्या सुट्यांवर गंडांतर
उन्हाळ्यातील सुटीवर गंडांतर आल्याने लहान मुले हिरमुसली आहेत. शिवाय यंदा मामाचे गावदेखील हुकले असल्यामुळे त्यांचे चेहरे केविलवाणे दिसत आहेत. कोविड-१९ (कोरोना) या व्हायरसच्या महामारीमुळे केंद्र व राज्य सरकारने लागू केलेल्या लाॅकडाउनमुळे नागरिकांनी आपल्यासह आपल्या परिवाराला चार भिंतीच्या आत बंदिस्त करून घेतल्याने बच्चे कंपनीच्या या आनंदावर विरजण पडले आहे.

हेही वाचाच - Nanded Breaking ; सात वर्षीय मुलगी, चार वर्षाचा मुलगा पॉझिटिव्ह

या उन्हाळ्याच्या सुटीत बच्चे कंपनी व त्यांच्या पालकांना मोबाईल व्हिडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातूनच मामा, मामी व इतर सर्व आप्तगण पाहायला मिळत असून त्याद्वारेच त्यांच्या भेटीगाठी होताना दिसून येत आहेत. सुटीच्या काळातील वेळ बच्चेकंपनी आपल्या घरात बसून मनोरंजनात्मक खेळ आणि टीव्ही, मोबाईल व इंटरनेटवरील खेळ खेळण्यातच घालवत आहेत. मामाच्या गावाला जाता येत नसल्याने व बाहेर पडून आपल्या मित्रांसोबत मनसोक्त खेळता येत नसल्याने बच्चेकंपनी खिन्न दिसून येत आहे.

येथे क्लिक कराच - विधायक : लॉकडाउनमध्ये बाप- लेकाने खोदली विहीर, पाणी प्रश्न कायमचा मिटवला

सवंगड्यांसोबत मौजमजा करण्यावरही निर्बंध
कोरोनापासून दूर राहण्यासाठी वडीलधाऱ्या मंडळींकडून घराबाहेर पडू नये, यासाठी दरडावण्यात येत आहे. त्यामुळे आपल्या गावातही संवगड्यांसह मौजमजा करण्यावर जबर निर्बंध आले आहेत. लाॅकडाउनमुळे एक-दोन दिवसांच्या पर्यटनावरही निराशेची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे यंदाची सुटी ही सुटी नसून जबरदस्त शिक्षा वाटत असल्याचे बच्चेकंपनीचे मत आहे. घराबाहेर न पडणे हे आपल्याला कोरोनापासून बचावासाठी अत्यंत गरजेचे आहे. हे मुलांना कोणत्या भाषेत सांगायचे हा पालकांसमोर सध्याचा यक्षप्रश्न आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why Did Mama's Village Get Lost That You Read Nanded News