
राष्ट्रीय वन्यप्राण्यासह काळवीट, हरीण, मोर, लांडोर, मरनागी मोठ्या प्रमाणात असलेल्या वनक्षेञाची पाहणी करून त्या क्षेञास अभयारण्य घोषित करावे
नांदेड : बिबट्या, खवल्या मांजर या राष्ट्रीय वन्यप्राण्यासह काळवीट, हरीण, मोर, लांडोर, मरनागी मोठ्या प्रमाणात असलेल्या वनक्षेञाची पाहणी करून त्या क्षेञास अभयारण्य घोषित करावे अशी मागणी वन्य प्राणी मित्रांकडून जोर धरल्या जात आहे.
तेलंगणा आणि महाराष्ट्र सिमेवरील बिलोली तालुक्यातील केरूर, अंजनी, मुतन्याळ, आदमपुर आदी वन परिक्षेञात मोठ्या प्रमाणात हरीण, मोर, लांडोर, मरनागी यासह सापांच्या विविध जाती आढळून आल्या. या भागात वन विभागाच्या वतीने जवळपास ७९९ हेक्टर क्षेञावर वृक्षलागवड झाल्यामुळे वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. याबाबत प्रशासनाने स्पष्ट केले की, बिलोली तालुक्यातील अंजनी येथील जवळपास २५० हेक्टर वन क्षेञात २०१८- १९ वर्षात झालेली वृक्षलागवड पाहता वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत हे खरे होय.
हेही वाचा - आता नवे संकट : सोयाबीन पिकावर पिवळी छटा
मांजरा नदीजवळ सगरोळी भागात बिबट्या आढळला होता
याबाबत वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी शिवानंद कोळी यांनी सुद्धा दोन- तीन वर्षात मोठ्या प्रमाणात वनांची वाढ झाल्याचे त्यामुळे वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याचे मान्य केले आहे. पण अभयारण्य घोषित करणे हे शासनाच्या आख्यत्यरातील बाब आहे असे स्पष्ट केले. काही महिन्यापुर्वी तेलंगणा महाराष्ट्र सिमेवरील मांजरा नदीजवळ सगरोळी भागात बिबट्या आढळला होता. तर बिलोली शहरात नुकतेच खवल्या मांजराची तस्करी उघडीस आली.
या क्षेञाला अभयारण्य घोषित करावे
हे अनुसुची एकचे राष्ट्रीय वन्य प्राणी लक्षात घेता शिवाय काळविट, हरीण, मोर, लांडोर, मरणागी यासह सापाच्या विविध जाती लक्षात घेता बिलोली तालुक्यातील वनक्षेञाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. येथे काळविट, हरीण, मोर व रानडुक्करांचा शेतकऱ्यांना होणारा ञास लक्षात घेता आणि बिबट्याचा वास लक्षात घेता या क्षेञाला अभयारण्य घोषित करावे अशी मागणी सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर यांच्यासह प्राणी मित्रांनी केली आहे.
येथे क्लिक करा - प्रधानमंत्री पिक विमा हप्ता भरण्याची मुदत ता. ३१ जुलैपर्यंत
वनसंपत्तीचे जतन करणे आवश्यक
किनवट व माहूर परिसराला जंगलाने वेढले आहे. या भागात मोठ्या प्रमाणात जंगली प्राणी आहेत. विशेष म्हणजे या जंगलात वक्षाचा राजा म्हणून संबोधल्या जाणारे सागाचे वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच मोहफुल व आदी वन संपत्ती मोठ्या प्रमाणात आहे. तसेच याबाबत लाकडांची तस्करी करणारी मंडळी या भागात वनविभागाला त्रासून सोडतात. या भागातही वन्य प्राणी आढळून येतात.