esakal | मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्‍नावर सामुहिक प्रयत्न करणार; मजविपच्या परिषदेत खासदारांची ग्वाही
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे ता. तीन मार्च रोजी कै. सदाशिवराव पाटील जयंती निमित्त आयोजित ऑनलाईन परिषदेच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. व्यंकटेश काब्दे होते.

मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्‍नावर सामुहिक प्रयत्न करणार; मजविपच्या परिषदेत खासदारांची ग्वाही

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : मराठवाड्यातील रेल्वे, विद्युतीकरण, दुहेरी मार्ग, नवीन रेल्वेमार्गास मंजुरी तसेच मंजुर रेल्वे मार्गांना गती व इतर रेल्वे विषयक प्रलंबित मागण्या मंजूर करून घेण्यासाठी आम्ही सर्वजण सामुहिक प्रयत्न करून, अशी ग्वाही मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे आयोजित ऑनलाईन परिषदेत बोलतांना खासदारांनी बोलातांना दिली.

मराठवाडा जनता विकास परिषदेतर्फे ता. तीन मार्च रोजी कै. सदाशिवराव पाटील जयंती निमित्त आयोजित ऑनलाईन परिषदेच्या अध्यक्षस्थानी मराठवाडा जनता विकास परिषदेचे अध्यक्ष माजी खा. डॉ. व्यंकटेश काब्दे होते. यावेळी मराठवाड्याचे रेल्वे प्रश्‍नावर बोलतांना मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान खासदार डॉ. भागवत कराड बोलतांना म्हणाले, मराठवाडा ते नांदेड रेल्वे लाईनच्या विद्युतीकरणाचा प्रश्‍न तसेच औरंगाबाद येथील पीट लाईनचा प्रश्‍न रेल्वे मंत्र्यांना भेटून मार्गी लावला आहे. तसेच मजविपच्या माध्यमातून मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्‍नावर केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले की, पाठपुरावा करण्यासाठी मी आपल्या सोबत असल्याचे सांगितले. यावेळी खा. फौजीया खान म्हणाल्या, पुर्णा जंक्शन येथे रेल्वेची मोठी जागा, इमारत व मुलभूत सुविधा असलेली संरचना धूळखात पडली आहे. कोट्यावधीच्या या मालमत्तेचा उपयोग करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाच्यावतीने एखादे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच मराठवाड्याच्या प्रश्‍नावर केंद्रात प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.

रेल्वे संघर्ष समितीचे ओमप्रकाश वर्मा यांनी रोटेगाव ते कोपरगाव या 22 कि.मी. लांबीच्या सर्वात जुन्या महत्त्वाच्या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करण्याची सूचना केली. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले, मजविपच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली मराठवाड्याच्या रेल्वे प्रश्‍नावर येत्या अधिवेशनात पाठपुरावा करू असे अभिवचन यावेळी त्यांनी दिले.

खा. सुधाकर श्रृंगारे यांचे प्रतिनिधी म्हणून मानधना श्यामसुंदर यांनी लातूर येथील पीटलाईनचे रेंगाळलेले काम पूर्ण करण्याची मागणी केली. संपादक तथा नांदेड जिल्हा रेल्वे संघर्ष समितीचे प्रमुख शंतनू डोईफोडे म्हणाले, वर्धा- नांदेडचे रखडलेले रेल्वे लाईनचे काम गतीमान होण्यासाठी नांदेड येथून देखिल सुरू करावे. तसेच मराठवाड्यातील रेल्वेच्या प्रमुख पाच मागण्याचे प्रस्ताव घेऊन रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेमंत्री यांची भेट घेऊन प्रश्‍न धसास लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मत व्यक्त केले.

खा. हेमंत पाटील यांच्या प्रतिनिधी म्हणून श्रीमती राजश्री पाटील यांनी मराठवाड्यातील रेल्वे प्रश्‍नासाठी केंद्र सरकारकडे प्रयत्न करण्याचे आश्‍वासन खासदार हेमंत पाटील यांच्यावतीने दिले. रेल्वे संघर्ष समितीचे उमाकांत जोशी म्हणाले, रेल्वे लाईनच्या विकासात सर्वाधिक खोडा असणारा आर. ओ. आर. उच्चाटन झाले पाहिजे. धर्माबाद रेल्वे संघर्ष समिती व प्रवाशी संघटनेतर्फे बोलतांना प्रा. बालाजी कोंपलवार म्हणाले, दक्षिण मध्ये रेल्वेतील मराठवाड्याचा भाग केंद्रिय रेल्वे विभागास जोडल्याशिवाय मराठवाडाला न्याय मिळणार नाही. त्यासाठी सेंट्रल रेल्वेला मराठवाडा जोडला पाहिजे. रेल्वेचे अभ्यासक रामराव थडके म्हणाले, महाराष्ट्राचे 47 प्रकल्प आर.ओ.आर. मध्ये अडकले आहेत. तसेच वर्धा- नांदेड व नांदेड- बीदर रेल्वे मार्गास गती द्यावी. नांदेड येथे रेल्वे अकादमी सुरू करावी. तसेच यावेळी प्राचार्य के. के. पाटील, अनंत बोरकर, श्री. कराड अंबाजोगाई, किरण चिद्रावार, गौतम नाहटा यांनी आपले विचार मांडले.

अध्यक्षीय समारोप करतांना माजी खासदार डॉ. व्यंकटेश काब्दे म्हणाले, चालू अर्थसंकल्पात मराठवाड्याच्या रेल्वे विकासाची तुटपुंजी तरतुद करण्यात आली आहे. मराठवाड्याच्या प्रलंबित विकास कामासाठी येत्या अधिवेशनात मराठवाड्याच्या खासदारांनी सामुहिक प्रयत्न करून पुरवणी अर्थसंकल्पात जादा निधी तरतुद करून घेणे गरजेचे आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मजविपचे सचिव प्रा. शरद अदवंत यांनी कले. कार्यक्रमाची सुरूवात पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ व कै. सदाशिवराव पाटील यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मजविपचे सहसचिव डॉ. अशोक सिध्देवाड यांनी केले तर आभार प्रा. डॉ. बालाजी कोम्पलवार यांनी मानले. परिषद यशस्वी करण्यासाठी प्राचार्य डॉ. आर. एम. जाधव, प्रा. पंढरी गड्डपवार व राहुल गवारे यांचे सहकार्य लाभले. परिषदेत औरंगाबाद, लातूर, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद व परळीचे मजविपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

loading image