
तिखट मिरचीने आणला आयुष्यात गोडवा
कुरुळा : कष्टाला पर्याय नसतोच मुळी, त्यातून उपजते ते सुरेख आणि सुंदर स्वप्न. प्रामाणिक कष्टातूनच खरेतर कर्माचे मूल्यमापन होते. परंतु ही गोळाबेरीज करण्याशिवाय चरितार्थाचा गाडा हाकन्यालाच काहींच्या जीवनात प्राधान्य असते. त्यातही कर्तबगार स्त्री सुखी संसारासाठी सर्वस्व पणाला लावते. कर्तृत्वान पुरुषांच्या यशस्वी कारकिर्दीमागे कर्तबगार स्त्रीची भूमिका महत्वाची असते. ती साकारत असताना, शुन्यातून संसारयशाचा परीघ रुंदावताना समाजात काही आदर्श महिला समोर येतात त्यापैकीच कुरुळा गावातील उर्मिलाअक्का कुंभरगावे या आहेत.
कुरुळा गावातील अक्कमहादेवी मिरची कांडण म्हणजे उर्मिलाअक्काचा संघर्षाला आधार देणारे केंद्र. जन्माने कुरुळा गावच्या असलेल्या ४५ वर्षीय उर्मिलाअक्का या त्यांचे पती दिलीप कुंभरगावे यांच्यासोबत २००० पासून कुरुळा गावात वास्तव्यास आहेत. ना स्वतःचे घर ना शेतीबाडी मिळेल ते काम करून गुजरान करण्यावाचून पर्याय नव्हता परंतु काहीतरी करण्याची उमेद उर्मिलाअक्का यांना स्वस्थ बसू देत नव्हती. २२ वर्षापूर्वी दोन मुली आणि एक मुलगा असे अपत्य असणाऱ्या उर्मिलाअक्का यांनी छोटेखानी व्यवसायात पदार्पण करण्याचे ठरवले. जवळची तुटपुंजी रक्कम आणि इतर काही पदरमोड करून मिरची यंत्र विकत घेतले. ‘कर्म हीच पूजा’ या सिद्धांतावर विश्वास ठेवून ‘अक्कामहादेवी मिरची कांडन’ या नावाने व्यवसाय सुरु केला. सुरवातीच्या काळात परिस्थिती जेमतेम असल्यामुळे कुणीही मदतीला येत नव्हते. त्यामुळे मिरची पावडर बनवण्यासाठी लागणारी मिर्ची आणि तत्सम लागणारी किराणा सामग्री कुणी उधारीवर देत नव्हते तरीही परिस्थितीला शरण न जाता व्यवसायाला उभारी देण्यासाठी त्या तत्पर राहिल्या.
कुरुळा परिसरातील खेडोपाडी त्यांनी स्वतःचे उत्पादित मिरची पावडर, हळद, मसाले आदी मुलगा गजाननच्या मदतीने घरोघर पोहचवत ग्राहकांचा उत्पादना विषयीचा विश्वास संपादन केला. आणि संसारातील इच्छांना मूर्त रूप देण्यासाठी उर्मिलाअक्काच्या हालचाली सुरू झाल्या. या छोटेखानी व्यवसायावर त्यांनी स्वतः ची जागा घेऊन घराचे बांधकाम करत दोन मुलींची लग्नही केली. या मुळे संसाराचा गाडा हळूवार का होईना प्रगतीच्या दिशेने धावायला लागला. आजमितीस त्यांच्याकडील २०० रु.कि.ग्रॅ.प्रमाणे दररोज २० ते ३० की.ग्रॅ. मिरची पावडर, हळद, मसाले या उत्पादिताची विक्री होते. याकरिता हैद्राबाद येथील खम्मम येथून मिरची खरेदी केली जाते. त्यांच्या उत्पादनास विशिष्ट चव असल्याने परिसरातील ग्राहक अधिकची पसंती देत आहेत.
''कुठलीही आर्थिक सुबत्ता पाठीशी नसतानाही तिखट मिरची पावडरच्या विक्रीतून आयुष्यात गोडवा आला असून निराधार महिलांनी खचून न जाता कुठल्याही लघुउद्योगाकडे वळावे.''
- उर्मिलाअक्का कुंभरगावे
Web Title: Women Day Special Story Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..