esakal | Womens day 2021 : डोळ्यात अंजन घालणारा अंजनाबाईचा संघर्ष; कसा आहे त्यांचा प्रवास ?
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जगण्यासाठी प्रेरणा देणारा वैधव्यातील खडतर प्रवास

Womens day 2021 : डोळ्यात अंजन घालणारा अंजनाबाईचा संघर्ष; कसा आहे त्यांचा प्रवास ?

sakal_logo
By
विठ्ठल चिवडे

कुरुळा (ता. कंधार, जिल्हा नांदेड ) : जगण्यासाठी प्रत्येकाला संघर्ष अटळ आहे. अनेक अडथळ्यांना पार करुन अस्तित्व टिकविण्यासाठी शर्यतीचे तीव्र संघर्षात रुपांतरण होते. कधी हा संघर्ष विकोपाला जाऊन परिस्थिती हाताबाहेर जाते. परंतु टोकाच्या संघर्षातही काही व्यक्तींकडून जगण्यासाठीची प्रेरणा मिळते अशा त्या अंजनाबाई. डोळ्यात अंजन घालणाऱ्या अंजनाबाईचा संघर्ष इतरांनाही जगण्यासाठी प्रेरणा देणारा असून वैधव्यातील त्यांचा हा एकाकी खडतर प्रवास इतरांनाही दिशादर्शक ठरु शकतो.

कुरुळा येथील अंजनाबाई साहेबराव केंद्रे यांनी गावकुसावर घरोबा थाटला. संसारवेल ऐन उमेदीच्या उंबरठ्यावर असतानाच दीड वर्षांपूर्वी क्षय रोगाने ग्रस्त असणारे पती साहेबराव यांचं निधन झालं आणि अकाली वैधव्याला अंजनाबाईना सामोरे जावे लागले. विवाहानंतर घरची परिस्थिती शिक्षणाच्या बाबतीत सामान्य असतानाही २०११ रोजी अंगणवाडी मदतनीस म्हणून त्या रुजू झाल्या आणि २०१४ ला पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. एकीकडे घरची बेताची परिस्थिती, साहेबरावांच्या औषधोपचारासाठी होणारी फरफट आणि पोटी तीन अपत्य असा जोखमीचा प्रवास. एक मुलगी आणि दोन मुले त्यापैकी एक ७०टक्के मतिमंद अशी परिस्थिती. एवढं सगळं प्रतिकूल असतानाही एखाद्या पुरुषालाही लाजवेल अशी यांत्रिकता अंजनाबाईच्या कामात दिसते. स्त्रीत्वाचा लेणं टाकून अंगी पुरुषत्वाचा आविष्कार झाल्यागत त्या सदैव कार्यमग्न दिसतात.

यशस्वीपणे एकचाकी संसाररथ पेलण्याची किमया

अकाली आलेल्या वैधव्यावर मात करत स्वतः सह मुलाबाळांच्या शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतला. मुलगी अश्विनी पदवी शिक्षण पूर्ण करुन विवाहबद्ध झाली. संग्राम पाचव्या इयत्तेत शिकत आहे तर मतिमंद वामन आईला इतर कामात मदत करतो. अंजनाबाई स्वतः कोरडवाहू पाच एकर शेती कसतात.सोबतच शिलाई मशीन आणि छोटी दाल मिल यातूनही त्यांच अर्थकारण चालू आहे. याबरोबरच कोंबड्यांचा छोटेखानी व्यवसाय आणि दोन म्हशींपासून दुग्धव्यवसाय अशी खडतर परंतु यशस्वीपणे एकचाकी संसाररथ पेलण्याची किमया त्यांनी साधली आहे.

प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन अनुकूल दिशेकडे वाटचाल करणारा प्रवास 

गावकुसावर तीन वर्षात स्वमेहनतीच्या बळावर सुमारे आठ लाख रुपयांचे घर बांधले. त्या ठिकाणी बोअरवेल घेत चार गुंठ्यावर कांदा आणि पालेभाज्यांची त्या लागवड करतात. त्यातूनही थोडेफार अर्थार्जन होत असल्याचे अंजनाबाई सांगतात. अंगणवाडी मदतनीस म्हणून नियमितपणे काम करताना वरिष्ठांना कुठल्याची तक्रारिला वाव दिला नाही. अंगणवाडीपासून घरगुती सर्व कामकाज इतर छोटेमोठे व्यवसाय, शेतीची कामे त्या स्वतः पुढाकार घेऊन पूर्णत्वास घेऊन जाताना त्यांचा हा प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन अनुकूल दिशेकडे वाटचाल करणारा प्रवास नक्कीच थक्क करणारा असून तो इतरांनाही नक्कीच मार्गदर्शक ठरु शकतो.

संपादन- प्रल्हाद कांबळे