मोजपुस्तिका झाल्यावरही कामाचा सपाटा सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोजपुस्तिका झाल्यावरही कामाचा सपाटा सुरूच असून प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे.

मोजपुस्तिका झाल्यावरही कामाचा सपाटा सुरू

भोकर - ग्रामीण भागाच्या विकासासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला मात्र मार्च अखेर कामे पूर्ण होणे बंधनकारक असतानाही काही ठिकाणी कामे अर्धवट स्थितीत राहिलेली आहेत. त्याचा एम. बी. (मोजमाप पुस्तिका) मार्च मध्येच तयार झाली. कामे मात्र अद्यापही काही ठिकाणी चालू असल्याचे चित्र दिसून येत आहे. तालुक्यातील ग्रामीण विकासासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करुन दिल्याने पाळज, किनी, कांडली, येथे पेवर ब्लॉकची कामे व सिमेंट रस्त्याचे कामे मार्च अखेर पूर्ण करण्याचे आदेशही होते. घाईगडबडीत कामे केल्याने कामाचा दर्जा म्हणावा तसा राहिलेला नाही. काही ग्रामपंचायती अंतर्गत कामे अपूर्णच राहिली मार्च अंतर्गत मोजमाप पुस्तिका तयार झाली मात्र कामे अद्यापही चालू असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.

चार ग्रामपंचायतींना सव्वातीन कोटीचा निधी

भोकर तालुक्यातील भोसी गटातील रिठा ह्या ग्रामपंचायतींना ८० लाख रुपयाचा निधी पेवर ब्लॉक व सिमेंट रस्त्याच्या कामासाठी मंजूर करण्यात आला. तसेच पाळज गटामधील किनी व पाळज या दोन ग्रामपंचायतींना प्रत्येकी (८० लाख रुपयाचा) निधी पेवर ब्लॉक व सिमेंट रस्त्यासाठी मंजूर करण्यात आला मात्र सदर ठिकाणची कामे प्रत्यक्षात दर्जेदार झाली का? कामाचा दर्जा कसा आहे? कामे प्रत्यक्षात ३१ मार्चपर्यंत कामे पूर्ण झाली का?, मार्च नंतर अपूर्ण कामे असतानाही एम.बी. करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. बऱ्याच ठिकाणी मार्च नंतर कामे अद्यापही चालू असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत असताना अधिकाऱ्यांनी सदर कामाचे मोजमाप पुस्तिका तयार केली आहे, हा मात्र गंभीर प्रकार दिसून येतो. भोकर तहसील कार्यालयातील सहायक प्रकल्प अधिकारी मात्र या कामांमध्ये पारंगत असून कामाचे नियोजन कसे लावायचे? कसे कामाची देयके काढायची? या बाबत मात्र मोठ्या हुशारीने काम करत असल्याचे बोलल्या जात आहे.

घाईगडबडीत कामे उरकली

तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींना ४०७ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला तसेच भोसी, रिठा व पाळज, किनी या चार गावांना विशेष करून प्रत्येकी ८० लाख रुपयाचा निधी देण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणावर गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन देण्यात आला. नंतर विकासात्मक दृष्टीने कामाचा दर्जा चांगला राहणे अपेक्षित आहे.

गुत्तेदार पद्धतीने झाली कामे

भोकर तहसील कार्यालयातील सहायक प्रकल्प अधिकारी व त्यांच्यासोबत काम करणारी यंत्रणा या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते. संबंधित योजनेअंतर्गत त्या गावातील मजुरांना काम मिळावे हा हेतू आहे मात्र गावातील मजुरांना काम मिळणे दूरच राहिले. मस्टरवर नाव टाकून प्रत्यक्षात दुसऱ्याचे मजूराकडून काम करून घेतल्या जाते. खोटे मजूर दाखवल्या जातात, बाहेरगावचे मजूर आणून गुत्तेदारी पद्धतीने काम केले जात आहे. कामांचा दर्जा मात्र संबंधित अधिकारी पाहत नाहीत कार्यालयात बसून देयके काढण्यासाठी तयारी करीत असतात. काही कामांची देयके कामे होण्यापूर्वीच केली जातात. हा गंभीर प्रकार भोकर तालुक्यात होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. अशा गंभीर प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी अशीही मागणी जोर धरते आहे.