वर्ष उलटले; पण कोरोना योध्यांचा रुग्णांसाठी न थकता अहोरात्र लढा

file photo
file photo

धर्माबाद ( जिल्हा नांदेड ) : तू न थकेगा कभी, तू न रुकेगा कभी, तू न मुडेगा कभी, कर शपथ, कर शपथ, कर शपथ, अग्निपथ, अग्निपथ अग्निपथ...
हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेच्या या ओळी कोरोना योद्धे डॉक्टर, परिचारिका, चतुर्थश्रेणी आणि प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अगदी खऱ्या ठरत आहेत. वर्ष उलटले, पण  कोरोना विरुद्ध धर्माबादेतील हे योद्धे न थकता दिवसरात्र लढत आहेत. हा लढा देतांना अनेक जण स्वतः बाधित झाले, पण त्यातून सावरून पुन्हा रुग्णसेवेत दाखल झाले.

धर्माबाद शहरातील माहेश्वरी भवन मधील कोविड सेंटर एप्रिल २०२० मध्ये सुरू झाले होते. तेंव्हापासून या ठिकाणी आरोग्य अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन जवळपास एक वर्ष होत आहे. पण कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. मध्यंतरी ऑक्टोंबर महिन्यात कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्याने येथील कोविड सेंटर ता. २९ ऑक्टोंबर रोजी बंद करण्यात आले होते. कोविड सेंटर बंद असले तरी ग्रामीण रुग्णालयात कोरोना तपासणी व रुग्णसेवा सुरूच होती. मार्च महिन्यांपासून मात्र धर्माबाद शहरात कोरोनाचा पुन्हा उद्रेक सुरू झाला आहे. शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे धर्माबादेत ता. २१ मार्च रोजी पुन्हा कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे.  धर्माबाद शहरात मार्च महिन्यांपासून आजपर्यंत ३०६ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. 

आतापर्यंत १४३० जणांची अँटीजेन तपासणी करण्यात आली असून यापैकी १३० जण कोरोना बाधित आढळून आले. तर ८६२  जणांची आरटीपीसीआर स्वॅब तपासणी करण्यात आली असून यापैकी १७६ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. होमहोमक्वारंटीन असलेल्या १९१ जणांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. सध्या कोविड सेंटरमध्ये एकूण ९९ जणांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी ४३ जणांना कोविड सेंटर मधून डिस्चार्ज देण्यात आला असून ५६ जण कोरोना बाधित माहेश्वरी भवन मधील कोविड सेंटरमध्ये दाखल असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गतवर्षी पेक्षा यावर्षी एका महिन्यातील कोरोना बाधितांची संख्या कितीतरी पटीने अधिक वाढली. कोरोना व्हायरसच्या भयामुळे साध्या शिंकणाऱ्या व्यक्तीपासून बहुतांश जण दूर पळतात, पण त्याच वेळी पॉझिटिव्ह रुग्णांवर डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी कोणतीही भिती न बाळगता निष्ठेने गेल्या वर्ष भरापासून उपचार करीत आहेत. येथील कोविड सेंटर, ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी खबरदारीसह सकारात्मक राहून रुग्णसेवा देत आहेत. कुणाचे बाळ लहान आहे. तर कुणाच्या घरी वयोवृद्ध आई वडील आहेत. 

तर कोणाला सहव्याधी आहेत. तरीही रुग्णसेवा देण्यात आरोग्य कर्मचारी पुढेच पाऊल टाकत आहेत. रुग्णसंख्या वाढली आहे. त्या तुलनेत कर्मचाऱ्यांची संख्या वाढली नाही. त्यामुळे कामाचा भार कोणतीही ठराविक वेळ न पाळता दिवसरात्र रुग्णांना सेवा देण्यात वैद्यकीय अधीक्षक डॉ. इकबाल शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मीनारायण केशटवार, डॉ. वेणूगोपाल पंडित, डॉ. शिवप्रेमा परबते, डॉ. नवाब असद, डॉ. तानुरकर, डॉ. प्रवीण कांबळे, डॉ. प्रदीप म्याकलवार, आरोग्य सेविका प्रगती शिरसे, शीतल जांभळे, पूजा दावलवार, कल्पना सोनटक्के, शालू बगारे, सुमन कांबळे, बेबीताई मनपूर्वे, माया कमलाकर, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यशवंत गनलेवार यांच्यासह आरोग्य कर्मचारी व्यस्त आहेत.

" कोविड सेंटरची जबाबदारी व कोरोनासाठी गेल्या वर्षभरापासून आपले कर्तव्य बजावत आहे. ही सेवा देतांना मी स्वतः कोरोना बाधित झालो. पण बरे होताच पुन्हा रुग्णसेवेत रुजू झालो. कोरोनाचे आव्हान पूर्वीपेक्षा अधिक वाढले आहे. अशात आम्ही सेवा देणे, हे आमचे कर्तव्य आहे.
- डॉ. इकबाल शेख, वैद्यकीय अधीक्षक, धर्माबाद.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com