नांदेड ः वर्षपूर्ती झाली, वचनपूर्तीचे काय? : आमदार प्रवीण दरेकर  

Nanded News
Nanded News

नांदेड :  ‘‘अर्धी जबाबदारी केंद्राकडे, अर्धी जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थेकडे व उरलेली जबाबदारी महाविकास आघाडीकडे...कुठलाही विषय आला की, केंद्राकडे बोट दाखवण्यातच महाविकास आघाडीचे एक वर्ष गेले’, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी केली.

भाजपच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी ते नांदेड दौऱ्यावर रविवारी (ता.२९) आले होते. त्यावेळ त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार राजेश पवार, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव गोजेगावकर, महानगराध्यक्ष प्रवीण साले, डॉ. संतुक हंबर्डे आदी उपस्थित होते.

श्री. दरेकर म्हणाले की, वीज माफीचा संदर्भ सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या संदर्भाने केलेले वक्तव्य म्हणजे पक्षांतर्गत विसंवाद दर्शविणारे आहे. त्यामुळे या तिन्ही पक्षामध्ये एक वाक्यता नसल्याने महाराष्ट्राचा विकास ठप्प झालेला आहे.  उर्जामंत्री नितीन राऊत यांनी शंभर युनिटपर्यंत विजमाफी देण्याची घोषणा केली होती. मात्र, अद्यापपर्यंत माफीती पूर्तता होऊ शकली नाही. मात्र, अशोक चव्हाण यांनी त्यांच्याच पक्षाच्या मंत्र्यास तोंडघशी पडणारे वक्तव्य केल्याचे बघायला मिळाल्याचेही श्री. दरेकर यांनी सांगितले.

महाविकास आगाडी सरकारचा वर्षभरातील कार्यकाळ निष्क्रिय राहिला आहे. विविध योजना, मराठा आरक्षण, शैक्षणिक धोरण, गत काळातील बंद पडलेले प्रकल्प पाहता हे सरकार वर्षभरात अपयशी झाले आहे. परिणामी आपला हा निष्क्रियपणा लपविण्यासाठी केंद्राकडे बोट दाखविणे इतकेच या सरकारचे काम राहिल्याचेही श्री. दरेकर यांनी सांगितले आहे. 

काय केले सरकारने?
बांधावर जावून कोरडवाहुसाठी २५ हजार आणि बागायतीसाठी ५० हजाराचं आश्वासन दिलं. मात्र, प्रत्यक्षात शेतकरी संकटात आल्यानंतर त्याच्या हाती एक दमडीही पडलेली नाही. कोरोनाचं संकट आले, हजारो मृत्यू झाले, पण त्यात सरकार म्हणून सरकारने काय केलं? मोफत विजेचं आश्वासन दिले होते. प्रत्यक्षात हजारो, लाखोंची बिलं जनसामान्यांना पाठवली, महिलांची सुरक्ष प्रथम म्हणून महिलांना आश्वासित केलं होते. परंतु, महिलांवरील अत्याचार एक वर्षामध्ये वाढले आहेत.

सरकार निष्क्रिय ठरले
आमचे गेल्या पाच वर्षातील विकासाची कामे बघून भाजपला महाराष्ट्रातील जनतेने मोठा जनाधार दिला. परंतु, विशिष्ट पदासाठी आमच्या मित्रपक्षाने इतर पक्षांसोबत बस्तान बांधले. हरकत नाही, परंतु, दिलेली आश्वासनेतरी पूर्ण करायला हवे होते. मात्र, विविध विचारधारेचे लोक शासनात असल्याने हे सरकार निष्क्रिय ठरले आहे.  
- आमदार प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेता (विधानपरिषद)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com