स्मार्ट स्किल्स : तरुणांनो, अशी करा स्वतःची इमेज तयार  

File photo
File photo

नांदेड : सध्याच्या व्यावसायिक युगात वेगवेगळ्या कंपन्यांकडून आपल्या मालाची प्रतिमा जाणीवपूर्वक लोकांच्या मनावर ठसवली जाते आहे. त्यासाठी लाखो रुपयांच्या जाहिराती केल्या जातात. मोठ मोठ्या स्टार कलाकारांना बोलावून असंख्य इव्हेंटही केले जातात. या सर्वांचा मूळ उद्देश ग्राहकांना आकर्षित करणे हाच असतो. या प्रतिमा निर्मितीचा कंपनीच्या उत्पादनांना भरपूर फायदा होतो. वेगवेगळ्या वस्तू हातोहात खपल्या जातात.

समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षांचा अभ्यास करणे व त्याला हवी असलेली स्वतःची इमेज बनवण्याकडे आज अनेकांचा कल असतो. स्पर्धेत स्वतःचे स्थान निर्माण करणे किंवा असलेले स्थान अबाधित ठेवण्यासाठी याचा वापर बरेच जण करताना दिसून येतात. अनेकांना यात धवल यशही मिळत आहे. मुलाखतीला जाण्यापूर्वी मुलाखत घेणाऱ्याची मानसिकता काय असेल याचा अंदाज बांधणे व त्यानुसार स्वतःच्या वागण्या बोलण्याच्या पद्धतीत बदल करण्याचे तंत्र आत्मसात करता आल्यास मुलाखतीत निवडले जाण्याची शक्यता वाढते. म्हणूनच इमेज बिल्डिंग संकल्पनेला खूपच महत्त्व आले आहे.

कसे कराल स्वतःचे मार्केटींग
इमेज बिल्डिंग म्हणजे स्वतःच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांचे सुव्यवस्थितपणे सादरीकरण करणे होय. काही प्रसंगांत आपल्या उणिवा झाकून जाव्यात व फक्त आपली सकारात्मक इमेज समोरच्या व्यक्तीसमोर तयार व्हावी, हाही इमेज बिल्डिंगमधील छुपा उद्देश असू शकतो. प्रतिमा निर्मिती म्हणजे एक प्रकारे स्वतःहून स्वतःचे मार्केटींग करणे होय. त्यासाठी सुंदर कपडे परिधान करणे, चांगले राहणीमान अवलंबणे, माध्यमातून अथवा सोशल मीडियातून जाणीवपूर्वक आपली एक विशिष्ट छबी तयार केली जाते. काही चांगल्या सवयी लावून घेणे. योग्य व्यक्तीच्या सान्निध्यात राहणे. समोरच्याला हवी असलेली प्रतिमा विशेष प्रयत्नाने तयार करण्यावर या संकल्पनेत भर दिला जातो.

तरुणांनी संकल्पनेचे महत्त्व समजून घ्यावे
आजकाल स्पर्धेच्या परीक्षेतून तयार होणारे अधिकारी प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी, किंवा समाजकंटकांवर वचक राहावा, यासाठी स्वतःच्या व्यक्तीमत्वात जाणीवपूर्वक बदल करतात. असलेल्या इमेजपेक्षा वेगळी इमेज तयार केली जाते. सहकाऱ्यामार्फत ती इमेज सर्वत्र पसरवली जाते. त्यामुळे प्रशासनातील काम सोपे होते. त्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांनी या संकल्पनेचे महत्व वेळीच समजून घेतले पाहिजे.

कौशल्यात पारंगत होण्याची गरज
इमेज बिल्डिंग ही संकल्पना अधिक खोलात जाऊन समजून घेण्याची गरज आहे. त्यातून जाणीवपूर्वक प्रतिमा तयार करण्याच्या कौशल्यात पारंगत होण्याचीही गरज आहे. असे केल्यास व्यावसायिकच नव्हे, तर स्पर्धेच्या क्षेत्रातही देदीप्यमान यश मिळवता येते. स्पर्धा परीक्षेत मुलाखतीची तयारी करणाऱ्या तरुणांना या कौशल्याचा फायदा होईलच; पण हे कौशल्य अंगी बाणवल्यास प्रभावी अधिकारी म्हणूनही आपला वेगळा ठसा उमटल्याशिवाय राहणार नाही, हे समुपदेशक प्रा. डॉ. अविनाश देशपांडे यांनी स्पष्ट केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com