nanded
nandedsakal

Nanded News : जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी बोलू लागले जपानी भाषा

शिक्षकांसाठी भविष्य वेध प्रशिक्षण; मारतळ्याच्या विद्यालयात अनोखा प्रयोग

मारतळा : मारतळा (ता. लोहा) येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत तुम्ही कधी गेला तर तेथील विद्यार्थी तुमच्यासोबत मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेसह उर्दू, जपानी आणि इटली भाषेत बोलले तर नवल वाटायला नको...कारण सध्या नांदेड जिल्ह्यातील सर्व शिक्षकांना भविष्य वेध प्रशिक्षण देण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून मारतळा येथील उपक्रमशील शिक्षक रवी ढगे यांनी मुलांना स्वयंप्रेरणेने शिकण्यास प्रवृत्त केले आहे. त्यातून पाचवी आणि सहावीतील विद्यार्थ्यांनी जपानी भाषा स्वतः अवगत केली आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. सविता बिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शिक्षकांना भविष्य वेध प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्यातूनच मारतळा येथील विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाच्या स्वागताचे ग्रीटिंग कार्डसुद्धा विविध भाषेत तयार केले आहेत. सहावीतील चैतन्या आनंदा ढेपे, सोनाक्षी कामाजी भोंग, वेदिका शंकर गिरी, सोहम परशुराम सोरटे, नंदिनी सुभाष ढगे आदी विद्यार्थी स्वयंप्रेरणेने जपानी भाषा इतरांना शिकवत आहेत. उपक्रमशील शिक्षक रवी ढगे हे मुलांना बहुभाषिक करत असल्याबद्दल सीईओ करनवाल, शिक्षणाधिकारी डॉ. बिरगे यांनी त्यांचे आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

जागतिक दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावे आणि सर्व विद्यार्थी हा बहुभाषिक असला पाहिजे. तो स्वयंप्रेरणेने म्हणजेच आत्मनिर्भरपणे चांगल्या प्रकारे ज्ञान मिळू शकतो. भविष्यात मुलांनी अधिक समृद्ध होणे आवश्यक आहे. या स्पर्धेच्या युगात जिल्हा परिषद शाळेचा विद्यार्थीसुद्धा कुठेही मागे राहणार नाही. तो जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी आपली वेगळी ओळख दाखवणार, या दृष्टीकोनातून सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असतो.

- रवी ढगे, उपक्रमशील शिक्षक, मारतळा.

भविष्य वेधी शिक्षण यात शिकणे, अनुभव घेणे ही एक आनंद देणारी, प्रेरणा देणारी आणि आपल्या सभोवतालच्या जगाची ओळख करून देणारी गोष्ट आहे. यात मुलांचा सहभाग महत्त्वाचा असतो. शिकणे कधी आणि कसे होते, हे आपल्या लक्षातही येत नाही. प्रत्येक मूल हे आपआपल्या गतीने शिकते; फक्त त्याला तेवढा पुरेसा वेळ देण्याची भूमिका आणि संयम हवा. या तत्त्वाचा वापर मारतळ्यातील शिक्षकांनी केल्याबद्दल त्यांचे व मुलांचे अभिनंदन.

- मीनल करनवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com